लोकसभेच्या 'या' ४ जागा लढवणारच, त्यासोबत...; जागावाटपावर अजित पवारांनी मौन सोडलं

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 12:33 PM2023-12-01T12:33:29+5:302023-12-01T12:34:07+5:30

जास्तीत जास्त खासदार महाराष्ट्रातून एनडीएच्या विचारांचे निवडून आणण्यासाठी माझ्यासह सर्वांना प्रयत्न करावे लागणार आहे असं अजित पवार म्हणाले.

Want to work to make Narendra Modi Prime Minister in Lok Sabha Election 2024 - Ajit Pawar | लोकसभेच्या 'या' ४ जागा लढवणारच, त्यासोबत...; जागावाटपावर अजित पवारांनी मौन सोडलं

लोकसभेच्या 'या' ४ जागा लढवणारच, त्यासोबत...; जागावाटपावर अजित पवारांनी मौन सोडलं

कर्जत - आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत मीडिया आणि पेपरमध्ये येणाऱ्या बातम्यांवर विश्वास ठेऊ नका. जागावाटपाबाबत प्राथमिक चर्चा सुरू झालीय. परंतु ५ राज्यांच्या निवडणूक निकालानंतर पुन्हा चर्चा होईल. आपण आपल्याकडे असणाऱ्या ४ जागा लढवणारच आहोत त्यासोबत अन्य जागांवरही निवडणूक लढवू असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवारांनी व्यक्त केला. 

कर्जत येथील चिंतन शिबिरात अजित पवार म्हणाले की, लोकसभेत निवडणूक झाल्यानंतर एनडीएचे नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान व्हावे यासाठी आपल्याला काम करायचे आहे. जास्तीत जास्त खासदार महाराष्ट्रातून एनडीएच्या विचारांचे निवडून आणण्यासाठी माझ्यासह सर्वांना प्रयत्न करावे लागणार आहे. आता आपल्याला बारामती, शिरुर, सातारा आणि रायगड या लढवणारच आहोत. पण त्यासोबतच इतर काही जागा ज्या उबाठा गटाकडं आहे जिथे राष्ट्रवादीची ताकद जास्त आहे. तिथे एकनाथ शिंदे आणि भाजपासोबत चर्चा करून काही जागा लढवायच्या आहेत. पेपर आणि मीडियाला बातम्या येतील लगेच त्यावर विश्वास ठेऊ नका. अमित शाह, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, एकनाथ शिंदे यांच्यासोबत प्राथमिक चर्चा झालीय. जागावाटपाबाबत प्राथमिक चर्चा सुरू झालीय.५ राज्यांच्या निकालानंतर पुन्हा बैठक होईल. मतदारसंघातील ताकद पाहून एनडीएच्या सर्व घटकांना सोबत घेत चांद्यापासून बांद्यापर्यंत लोकसभेच्या निवडणुकीचं काम करायचे आहे. आपल्याला वेगवेगळी बरीच कामे आहेत असं त्यांनी सांगितले. 

तसेच २ दिवसांपासून पक्षाचे अधिवेशन सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे विचारमंथन होतंय. राज्यातील ३६ जिल्ह्यातील सहकारी, वडिलधाऱ्यांनी, जीवाभावाच्या कार्यकर्त्यांनी जो भाग घेतला त्याबद्दल मी मनापासून तुमचे अभिनंदन करतो. राष्ट्रवादीचं हे शिबीर ४००-५०० लोकांपुरते मर्यादित असल्याने अनेकांना इच्छा असूनही येता आले नाही. कार्यकर्ते असले की संघटना मजबूत होते. तो संघटनेचा कणा आहे. आज जरी मर्यादित सहकाऱ्यांच्या उपस्थितीत  शिबीर घेतले असले तरी आपल्याकडे वेळ कमी आहे. माझ्या अंदाजानुसार मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागेल असं अजित पवारांनी म्हटलं. 

दरम्यान,छत्रपतींच्या रयतेच्या राज्याची प्रेरणा घेऊन शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांना राष्ट्रवादीने आदर्श मानलेले आहे. काहीजण म्हणतात, या कारणासाठी गेले. केसेस होत्या त्या थांबाव्यात म्हणून गेले असा आरोप करतात. १९९९ पासून मी, तटकरे यांनी मंत्रिमंडळात काम केलेत, आमच्यावर आरोप झाले, पण आरोप सिद्ध व्हायला हवेत, वस्तूस्थिती असावी. माझ्यावरील आरोपांमुळे जलसंपदा विभागातील कामांची गती थांबली. माधवराव चितळेंनी जे श्वेतपत्रिका काढली त्याचा अहवाल आहे. आरोप झाले होते, मी आज ३२ वर्ष काही अपवाद वगळता मंत्रिपदावर काम करतोय. २०१२ ला राज्यात भारनियमनातून महाराष्ट्राला मुक्त केले. आम्ही दिलेला शब्द पाळतो, जे बोलतो तसे वागतो. आज जवळपास ६ लाख कोटींचे बजेट अर्थ आणि नियोजन विभागाकडे जबाबदारी असते. माझ्याकडे जीएसटीची जबाबदारी आहे, तब्बल २ लाख कोटी कर गोळा होतो. पण पारदर्शक काम आहे. कार्यकर्त्यांचे काम व्हावं यापेक्षा त्याला काय हवं असते? असं अजित पवारांनी सांगितले. 

...मग जिल्हाध्यक्षांना प्राधान्य देणार

यापुढे माझ्या कार्यालयात विकासकामांसाठी येणार असाल तर पहिले प्राधान्य मंत्र्यांना, त्यानंतर आमदार, खासदारांना आणि तिसरे प्राधान्य पक्षाच्या जिल्हाध्यक्षांना असेल. आपण पक्षातील पदावरील लोकांना मानसन्मान दिला पाहिजे. माझ्यासह हे सर्व मंत्र्यांना लागू आहे असं अजित पवारांनी सूचित केले. 
 

Web Title: Want to work to make Narendra Modi Prime Minister in Lok Sabha Election 2024 - Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.