मुंबई : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी अटकेत असलेल्या वेर्नोन गोन्साल्विस याच्या घरातून जप्त केलेली सर्व पुस्तके गुन्ह्याशी संबंधित आहेत, असे आपले म्हणणे नव्हते. लिओ टॉलस्टॉय यांचे ‘वॉर अँड पीस’ हे उत्तम दर्जाचे साहित्य आहे, हे मला माहीत आहे, असे स्पष्टीकरण उच्च न्यायालयाने बुधवारी दिले. न्यायालयाने ज्या ‘वॉर अँड पीस’चा उल्लेख केला ते पुस्तक कोलकात्याचे पत्रकार बिस्वजीत रॉय यांनी संपादित केलेले ‘वॉर अँड पीस इन जंगलमहल’ हे पुस्तक असल्याचे आरोपीच्या वकिलांनी स्पष्ट केले.
‘वॉर अँड पीस’ यासारखी आक्षेपार्ह पुस्तके का बाळगण्यात आली, असा प्रश्न न्या. सारंग कोतवाल यांनी गोन्साल्विस याला बुधवारी केला. या प्रश्नाबाबत गुरुवारी उच्च न्यायालयाने स्पष्टीकरण दिले.या केसमधील सहआरोपीच्या वकिलांनी याबाबत न्यायालयात स्पष्टीकरण देताना म्हटले की, बुधवारी न्यायालयाने ज्या ‘वॉर अँड पीस’बाबत प्रश्न उपस्थित केला ते पुस्तक लिओ टॉलस्टॉय यांचे नसून कोलकात्याचे पत्रकार बिस्वजीत रॉय यांनी संपादित केलेल्या निबंधांचा संग्रह आहे आणि याचे नाव ‘वॉर अँड पीस इन जंगलमहल : पीपल स्टेट अँड माओइस्ट’ असे आहे.
प्रकाशकाच्या म्हणण्यानुसार, प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ते, शिक्षणतज्ज्ञ, मध्यस्थी यांनी सरकारच्या शांततेच्या उपक्रमाचे अपयश व विकासात्मक धोरणांतील अपयश, संसदीय पक्षांचा दुटप्पीपणा आणि माओवाद्यांबाबत या निबंधाद्वारे आपले मत व्यक्त केले आहे.मात्र, न्यायालयाने लिओ टॉलस्टॉय यांच्या पुस्तकावरून हा प्रश्न उपस्थित केल्याचा समज करून गुरुवारी दिवसभर ट्विटरवर संताप व्यक्त झाला. ‘दी हॅशटॅग # वॉरअँडपीस’ ट्रेंडला उधाण आले होते.गुरुवारच्या सुनावणीत गोन्साल्विस यांचे वकील मिहीर देसाई यांनी न्यायालयाला सांगितले की, गेल्या वर्षी सरकारने या (‘वॉर अँड पीस इन जंगलमहल : पीपल स्टेट अँड माओइस्ट’) पुस्तकावर बंदी घातली आहे. त्यांच्या या विधानानंतर न्यायालयाने स्पष्टीकरण दिले.
लिओ टॉलस्टॉय यांचे ‘वॉर अँड पीस’ हे उत्कृष्ट दर्जाचे साहित्य आहे. दोषारोपपत्राला जोडण्यात आलेल्या पंचनाम्यातील सर्व पुस्तकांची यादी मी वाचत होतो. खराब हस्ताक्षरात यादी लिहिली होती. मला ‘वॉर अँड पीस’ माहीत आहे. मी शंका उपस्थित केली, मात्र सर्वच पुस्तके गुन्ह्याशी संबंधित आहेत, असे माझे म्हणणे नव्हते,’ असे न्या. कोतवाल यांनी स्पष्ट केले.‘न्यायालय टॉलस्टॉय यांच्या नाही, तर रॉय यांच्या पुस्तकांचा संदर्भ देऊन बोलले,’ असे या प्रकरणातील सहआरोपी सुधा भारद्वाज यांचे वकील युग चौधरी यांनी स्पष्ट केले.‘वॉर अँड पीस’बद्दल बोलण्यापूर्वी अनेक पुस्तकांचा संदर्भ दिला. ‘राज्य दमन’चाही संदर्भ दिला. न्यायाधीश न्यायालयात शंका उपस्थित करू शकत नाहीत?’ असे न्यायालयाने म्हटले.
गोन्साल्विसच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, गोन्साल्विसकडे २ हजार पुस्तके आहेत. त्यातील एकाही पुस्तकावर न्यायालयाने बंदी घातलेली नाही. ही पुस्तके आॅनलाइनही उपलब्ध आहेत. कदाचित ही पुस्तके जप्त करण्यापूर्वी पोलिसांना याबाबत माहिती नसेल. त्यामुळे गोन्साल्विसच्या ताब्यातील पुस्तकांवरून त्याचा माओवाद्यांशी संबंध आहे, असे म्हणणे अयोग्य आहे.सुनावणी आजपर्यंत तहकूबदेसाई यांनी त्यांचे म्हणणे मांडले आहे, असे म्हणत न्यायालयाने या याचिकेवरील पुढील सुनावणी शुक्रवारपर्यंत तहकूब केली.