अहमदनगर : पायदळाच्या सूचनांवर बॉम्बगोळ्यांचा वर्षाव करून शत्रूला उद्ध्वस्त करणारे आधुनिक तंज्ञत्रानयुक्त रणगाडे, त्यांच्या मदतीला हवाई हल्ले अन् जवानांची चढाई अशा वातावरणात के. के. रेंज परिसरात प्रत्यक्ष युद्धासारखा थरार रंगला. येथील एसीसी अॅण्ड एस व एमआयआरसी या सैन्य प्रशिक्षण केंद्रातर्फे बुधवारी सकाळी अहमदनगरपासून १५ किमीवरील खारेकर्जुनेच्या माळरानावर हा फायर डेमो पार पडला. सुमारे दहा चौरस किलोमीटरचा परिसर दोन तासांत बेचिराख झाला. पायदळ व रणगाडाचालक यांचा नेमका समन्वय, चालत्या रणगाड्यातून शत्रूच्या हालचाली टिपत एकाच वेळी जमिनीवर व हवेतही केलेला अचूक मारा यातून भारतीय सैन्याची सज्जता, साहस आणि पराक्रमाचा प्रत्यय आला. प्रारंभी पायदळाने शत्रूच्या दिशेने लपतछपत कूच करायची, शत्रू निशाण्यावर आल्यानंतर मागे असलेल्या रणगाडा सैन्याशी (सपोर्ट फायर) समन्वय साधून क्षेपणास्त्रांनी शत्रूचे अड्डे उद्ध्वस्त करायचे, गरज भासलीच तर हवाई हल्ल्यासाठी हेलिकॉप्टर, सुखोई लढाऊ विमाने सज्ज, असा युद्धाचा प्रत्यक्ष थरार पाहून उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. आर्मर्ड कोअर सेंटर अॅण्ड स्कूलचे कमांडंट मेजर प्रवीण दीक्षित, मॅकेनाईन्ड इन्फट्री रेजिमेंट सेंटरचे ब्रिगेडिअर व्ही. एस. वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली हे युद्धाचे प्रात्यक्षिक झाले. प्रात्यक्षिकानंतर रणगाडे, क्षेपणास्त्रे तसेच युद्धात वापरण्यात येणाऱ्या बंदुका, दारूगोळा उपस्थितांना पाहण्यासाठी खुला करण्यात आला होता. (प्रतिनिधी)
नगरमध्ये युद्धाचा थरार!
By admin | Published: January 07, 2016 2:36 AM