पुणे : जो अनुभवी आहे, तो आपले विचार मांडतोच. काही प्रमाणात वादही होतात. वाद होणे हे चांगलेच लक्षण आहे. उलट ‘विचारांचे वॉर’ हवेच. त्यातूनच कामाविषयीचे मार्गदर्शन मिळत राहते, असे स्पष्ट मत अभिनेते मोहन जोशी यांनी व्यक्त केले. जयंत बेंद्रे यांनी शब्दांकन केलेल्या मोहन जोशी यांच्या ‘नटखट’ या आत्मचरित्राचे प्रकाशन २८ डिसेंबर रोजी ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते पुण्यात होत आहे. त्यासंदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आत्मकथनात्मक पुस्तकाचा प्रवास उलगडताना ते म्हणाले, वयाच्या ६ ते ६१ वर्षांपर्यंतचा काळ यामध्ये शब्दबद्ध करण्यात आला आहे. वयाच्या सहाव्या वर्षापासून अनुभव लिहित आहे, त्यासाठी ३६ प्रश्न काढले, मात्र लिहिण्याचे विशेष ज्ञान नसल्याने कॅसेटमध्ये बोलणे रेकॉर्ड करून ठेवत होतो. अशा सुमारे ६५ कॅसेटस् झाल्या.स्वत:च्या आयुष्याचा गंभीरपणे विचार करताना जे काही चढउतार आले, चांगले वाईट-अनुभव आले, कोणत्या परिस्थितीतून कुठून कुठपर्यंत आलो त्याचा धांडोळा घेत ज्या रसिकांनी प्रेम दिले त्यांच्यासह नवीन पिढीला हे पुस्तक मार्गदर्शक ठरावे, हे यामागचे प्रयोजन असल्याचे त्यांनी सांगितले. निरीक्षण ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. माणूस मोकळा होतो तेव्हाच तो खरे बोलतो, पुस्तकातील एकही गोष्ट कल्पातीत नाही, त्यातील आकलन हे प्रांजळ आहे. यापुढील आयुष्य कसे जगायचे हे देखील ठरवले आहे. यावेळी बेंद्रे आणि सुनील महाजन उपस्थित होते.
विचारांचे युद्ध हवेच - मोहन जोशी
By admin | Published: December 24, 2014 2:14 AM