मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी सुरू असलेल्या प्रभाग फेररचनेत शहरातील सात प्रभाग कमी झाल्याची खबर लागताच नगरसेवक धास्तावले आहेत. एकीकडे आरक्षणात प्रभाग हातून निसटण्याची टंगती तलवार, आणि त्यातूनही वाचल्यास प्रभागांच्या फेररचनेचा फास अशा कैचीत सापडण्याची चिन्हे दिसल्याने नगरसेवकांची धावाधाव सुरू आहे. काही नगरसेवकांनी आपले राजकीय वजन वापरून प्रभागांच्या नवीन सीमारेषेचा अभ्यास सुरू केला आहे. तर काही दिग्गजांनी आपल्या प्रभागांसह आसपासच्या प्रभागांमध्येही मोर्चेबांधणी सुरू केली आहे.२०१७ मध्ये महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक आहे. गेल्या काही वर्षांमध्ये शहरातील लोकसंख्या उपनगरांकडे स्थलांतरित झाली. त्यामुळे लोकसंखेच्या आधारे प्रभागांची फेररचना करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र या फेररचनेच्या पहिल्याच बदलाने शहरातील नगरसेवकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. शहर भागातील नगरसेवकांची संख्या ६३ वरुन ५६ वर घसरली आहे. अन्य प्रभागांमध्ये विलीन करण्यात आल्याने प्रभागांचे आकारमानही वाढणार आहे. याचा फायदा उपनगरांना होणार आहे. शहरात सातजणांना घरी बसावे लागत असताना उपनगरांमध्ये इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र प्रभाग फेररचना आणि आरक्षण असे दुहेरी संकट अद्यापही नगरसेवकांवर घोंघावत आहे. त्यामुळे दिग्गजांनी आपला दावा कायम राहण्यासाठी विद्यमान व संभाव्य प्रभागात आपला निधी खर्च करण्यास सुरुवात केली आहे. फेररचनेचा अंतिम मसुदा जाहीर होण्याआधीच अनेक बड्या नगरसेवकांनी आपल्या नविन प्रभागांच्या सीमारेषांची पाहणी करून मतदारांचा अंदाज घेण्यास सुरुवात केली आहे. (प्रतिनिधी)प्रभाग रचनेतील बदलकुलाबा, पायधुनी, चंदनवाडी, ग्रँटरोड, भायखळा या प्रभागांमध्ये प्रत्येकी एक तर प्रभादेवीमध्ये दोन प्रभाग कमी झाले आहेत. त्यामुळे शहरातील नगरसेवकांची संख्या घटली आहे.गोरेगाव, दहिसरमध्ये प्रत्येकी एक आणि मालाड, कांदिवलीत प्रत्येकी दोन प्रभाग वाढले आहेत. त्यामुळे पश्चिम उपनगरत नगरसेवक संख्या ९७ वरून १०२ इतकी झाली आहे.चेंबूर, घाटकोपरच्या हद्दीतील प्रत्येकी एक प्रभाग कमी झाला. तर कुर्ला, भांडुपमध्ये प्रत्येकी एक आणि मानखुर्दमध्ये दोन प्रभागांची भर पडली आहे. त्यामुळे पूर्व उपनगरांत प्रभागांची संख्या ६७ वरुन ६९ होणार आहे.
प्रभाग फेररचनेने वाढवले नगरसेवकांचे टेन्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2016 5:18 AM