अनिकेत घमंडी, डोंबिवलीशहरातील वाढत्या गुन्हेगारीवर त्यातही सोनसाखळी चोरीसह जीवघेण्या हल्ल्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी ‘वॉर्ड रक्षक दल’ स्थापन करण्याच्या संकल्प डोंबिवलीतील पोलिसांनी सोडला आहे. आघाडी सरकारच्या काळातील ‘ग्राम सुरक्षा दलाच्या संकल्पने प्रमाणेच ही यंत्रणा राबविण्याचा पोलिसांचा मानस आहे.ही योजना राबवण्साठी प्रामुख्याने रामनगर पोलिसांनी चंग बांधला आहे. त्यादृष्टीने त्यांच्या पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या वॉर्डांतील संबंधित नगरसेवकांसह सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांशी चर्चा सुरू आहे.या पोलीस ठाण्यांतर्गत १५ वॉर्ड येतात. दिवसाला पाच-सात जणांचा ग्रुप अशा पद्धतीने आठवड्याला प्रत्येक वॉर्डातून ४० युवकांची चमू या यंत्रणेत असणे अपेक्षित आह, जेणेकरून आठवड्याच्या एका वारी त्या विशिष्ट चमूला रात्रीचा पहारा करण्याची वेळ येईल. त्यापेक्षा जास्त युवक असतील तर चांगलेच! म्हणजे प्रत्येक चमूची फेरी तेवढ्या जास्त दिवसांनी येईल व कोणालाही कसलेही दडपण येणार नाही. या चमूने वॉर्डात राउंड मारून कुठेही संशयास्पद हालचाली दिसल्या तर त्याबाबत पोलिसांना तत्काळ सूचित करणे, संबंधितांची चौकशी करणे, त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे, पोलिसांसह नागरिकांशी समन्वय साधणे असे उपक्रम करणे अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले.आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या संकल्पनेनुसार ग्रामपंचायत स्तरावर ग्राम सुरक्षा दल स्थापन करण्यात आले होते. त्याच धर्तीवर शहरांमध्ये महापालिका असतात. त्या ठिकाणी वॉर्ड/प्रभाग असतात. म्हणून त्यास वॉर्ड सुरक्षा दल अशी संकल्पना समोर येत आहे.
डोंबिवलीत आता वॉर्ड सुरक्षा दल
By admin | Published: December 15, 2014 3:55 AM