ऑनलाइन लोकमत -
वर्धा, दि. 31 - वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील केंद्रीय दारूगोळा भांडारामध्ये (सीएडी कॅम्प) झालेल्या स्फोटात दोन अधिका-यांसह एकूण 17 जवानांचा मृत्यू झाला आहे. तर 17 जवान जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. सोमवारी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास हा भीषण स्फोट झाला आणि त्यानंतर आग लागली. आग लागल्यानंतर परिसरात मोठे स्फोट झाले. त्यामुळे परिसरातील गावांना जबर हादरे बसले.
मृतांमध्ये लेफ्टनंट कर्नल आर एस पवार आणि मेजर मनोज यांचा समावेश आहे. केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी वर्ध्याला जाण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना घटनेवर शोक व्यक्त केला असून आपण पिडीतांच्या कुटुंबासोबत असल्याचं म्हटलं आहे. जखमी जवान लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थन करत असून मनोहर पर्रिकरांना घटनास्थळी जाऊन पाहणी करण्यास सांगितल असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली आहे.
Pained by loss of lives caused by a fire at central ammunition depot in Pulgaon, Maharashtra. My thoughts are with the bereaved families.— Narendra Modi (@narendramodi) May 31, 2016
I pray that those who are injured recover quickly. Have asked RM @manoharparrikar to visit the spot & take stock of the situation.— Narendra Modi (@narendramodi) May 31, 2016
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आग नियंत्रणात आल्याची माहिती दिली आहे. अत्यंत दुर्देवी घटना असून आपलं खुप मोठं नुकसान झालं आहे. जिल्हास्तरीय अधिका-यांना शक्य तेवढी मदत पुरवण्याचे आदेश दिल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.
According to my info, fire is now under control: Maharashtra CM Devendra Fadnavis on army depot fire pic.twitter.com/5KVoduBB1A— ANI (@ANI_news) May 31, 2016
स्फोट झाल्यानंतर लागलेली आग इतकी भीषण होती की कॅम्प परिसरालगतच्या १५ कि.मी. परिघातील गावांतील नागरिक प्रचंड दहशतीत होते. या भांडारात प्रचंड क्षमतेच्या बॉम्बचे स्फोट होत असल्याने आगीच्या ज्वाळा देवळी तालुका मुख्यालयातूनही दिसत होत्या. कॅम्प परिसरालगतच्या नागझरी भागाला आग लागली असल्याने इंझाळा, पिपरी, आगरगाव, मुरदगावासह सुमारे १५ गावांतील नागरिक देवळीच्या दिशेने जीव वाचवित पळू लागले.
या स्फोटामुळे केंद्रीय दारुगोळा भांडाराजवळील दोन गावं नागझरी आणि आगरगाव येथील नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलं आहे. पुलगाव दारुगोळा केंद्राचा संपूर्ण भाग हा लष्कराच्या अखत्यारित येतो. त्यामुळे येथे स्फोट कशामुळे घडला याचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.
शिवाय डेपो परिसरातील गावे खाली करण्यात आली. डेपो परिसरालगतच्या झाडाझुडपांना सोमवारी अचानक आग लागली ही बाब वेळीच कुणाच्याही लक्षात न आल्याने आगीने भीषण रुप धारण केले. हीच आग डेपो परिसरात पसरल्याने घटना घडल्याचे प्रत्यक्षदर्शीने लोकमतला सांगितले. घटनेची माहिती मिळताच पुलगाव शहरातही एकच खळबळ उडाली.