ऑनलाइन लोकमतवर्धा, दि. ३१ - वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील केंद्रीय दारूगोळा भांडाराला लागलेल्या भीषण आगीमध्ये १७ जणांचा मृत्यू झाला असून १९ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एक लेफ्टनंट कर्नल आणि एका कर्नलसह दोघा अधिका-यांचा समावेश आहे. रात्री दीड ते दोनच्या दरम्यान दारुगोळा भांडारात आग भडकली.
नागपूरपासून ११० कि.मी. अंतरावर पुलगावचा दारुगोळा कारखाना आहे. आग लागल्यानंतर झालेल्या स्फोटांमुळे आग अधिकच भडकली. आगीने रौद्र रुप धारण करताच आसपासच्या गावातील नागरीकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. या अग्नि दुर्घटनेच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे.
पुलगावचा कारखाना देशातील लष्कराच्या मोठया दारुगोळा भांडारापैकी एक आहे. आग एवढी भीषण होती की, कॅम्प परिसरालगतच्या १५ कि.मी. परिघातील गावांतील नागरिक भेदरले होते. आगीच्या ज्वाळा देवळी तालुका मुख्यालयातूनही दिसत होत्या. इंझाळा, पिपरी, आगरगाव, मुरदगावासह सुमारे १५ गावांतील नागरिक देवळीच्या दिशेने गेले.
डेपो परिसरालगतच्या झाडाझुडपांना सोमवारी अचानक आग लागली ही बाब वेळीच कुणाच्याही लक्षात न आल्याने आगीने भीषण रुप धारण केले. हीच आग डेपो परिसरात पसरल्याने घटना घडल्याचे प्रत्यक्षदर्शीने लोकमतला सांगितले. घटनेची माहिती मिळताच पुलगाव शहरातही एकच खळबळ उडाली. पोलीस प्रशासन, लष्कर आणि अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.