वर्धा: राज्यासह देशावर कोरोनाचं संकट असताना त्यात म्युकर मायकोसिसची भर पडली. म्युकर मायकोसिसच्या रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. या आजारावरील औषधं उपलब्ध होत असल्यानं समस्या वाढत आहेत. या परिस्थितीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या प्रयत्नानं वर्ध्यात म्युकर मायकोसिसवरील इंजेक्शनची निर्मिती होणार आहे. महाराष्ट्र, गुजरातसह अनेक राज्यांमध्ये सध्या म्युकर मायकोसिसच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या परिस्थितीत वर्ध्यात या आजारावरील इंजेक्शन्सची निर्मिती होणार आहे. वर्ध्यातील जेनेटिक लाईफ सायन्सेस कंपनी म्युकर मायकोसिसवरील एम्फोटेरीसीन बी इंजेक्शन तयार करणार आहे. या कंपनीला राज्याच्या एफडीएनं परवानगी दिली आहे. पुढील १५ दिवसांत कंपनी इंजेक्शनचं उत्पादन सुरू करेल. यामध्ये नितीन गडकरींनी मोलाची भूमिका बजावली आहे. गेल्या काही दिवसांत राज्याच्या अनेक शहरांमध्ये म्युकर मायकोसिसचे रुग्ण आढळून आले आहेत.
म्युकर मायकोसिसच्या संकटातूनही मार्ग निघाला; गडकरींनी बजावली मोलाची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 9:27 PM