- महेश सायखेडेवर्धा - रक्षाबंधन पूर्वी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात २०० रुपयांनी घट आली. विरोधकांकडून याच विषयाचे राजकारण करून गॅस सिलिंडरच्या भावात घट ही केंद्रातील मोदी सरकारकडून नागरिकांसाठी निवडणूक गिफ्ट असल्याची टिका केली जात आहे. पण वास्तविक पाहता जागतिक बाजारपेठेत भावात घट आल्याने त्याचा थेट परिणाम होत गॅस सिलिंडरच्या भाव गडगडले. आंतराष्ट्रीय बाजारपेठेत पेट्रोलियम पदार्थांच्या भावात घसरण आल्याने गॅस सिलिंडरच्या दरात घट आली आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा. प्रफुल्ल पटेल यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने स्थानिक दादाजी धुनिवाले मठाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या परिवर्तन मेळाव्यात ते उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष सुरेश चव्हाण, माजी मंत्री सुबोध मोहिते, क्रांती जांबुवंतराव धोटे, वर्धाचे जिल्हाध्यक्ष शरद सहारे, नागपूरचे जिल्हाध्यक्ष बाबा गुजर, ईश्वर बाळबुधे, प्रशांत पवार, मेघा पवार, रवी पराते, सरोज दाते, बलराज लोहवे, उज्ज्वल काशीकर आदींची उपस्थिती होती.
विरोधकांच्या आघाडीचे नाव इंडिया नाहीचभारत देशाच्या सर्वांगीण विकासासाठी स्थिर सरकार हवेच. विरोधक त्यांच्या आघाडीचे नाव इंडिया असे सांगत आहेत. पण विरोधकांच्या आघाडीचे नाव इंडिया नाहीच. ते 'आय डॉट एन डॉट डी डॉट आय डॉट ए' असे आहे. त्यांच्यात लोगोसाठी वाद होत आहे. स्थिर सरकारच देशाचा विकास करू शकते, असेही यावेळी खा. प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले.
मराठ्यांना आरक्षण मिळायला पाहिजे ही राकाँची भूमिकामराठा आरक्षणा बाबात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागू देता मराठा आरक्षणाचा विषय निकाली काढण्यासाठी राकाँचे नेते छगन भुजबळ आणि आपण स्वत: विशेष प्रयत्न करीत आहोत. जालना येथील घटनेची चौकशी होत दोषींवर कारवाई झाली पाहिजे. मराठा आरक्षणाचा तांत्रिक अडचणींचा विषय सर्वोच्च न्यायालयात आहे. तो निकाली निघावा यासाठी प्रयत्नही होत आहेत, असे खा. प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.