मुंबई : वर्धा जिल्ह्यातील सिंदी रेल्वे येथे साडेतीनशे एकर जमिनीवर ड्रायपोर्ट उभारण्याचा मार्ग आता प्रशस्त झाला आहे. या बाबतचा शासकीय आदेश येत्या काही दिवसांत निघणार आहे. जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टकडून (जेएनपीटी) या प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे. सध्या ही जमीन स्टेट इंडस्ट्रियल अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन म्हणजे सिकॉमच्या ताब्यात आहे. सिकॉम आणि मूळ जमीन मालकांत वाद होता आता तोही सोडविण्यात आला असून सिकॉम आणि जमीन मालकांना जेएनपीटीकडून जमिनीची किंमत दिली जाणार आहे. राज्य शासन निश्चित करेल ती किंमत जेएनपीटी देईल, असे जेएनपीटीचे अध्यक्ष अनिल डिग्गीकर यांनी आज लोकमतला सांगितले. जेएनपीटीच्या संचालक मंडळाने या ड्रायपोर्ट संदर्भात शासनाशी चर्चा करून निर्णय घेण्याचे सर्वाधिकार डिग्गीकर यांना दिले आहेत. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात या आधीच सदर प्रकल्पाच्या उभारणीबाबत चर्चा झाली आहे. नागपूर-मुंबई सुपर एक्स्प्रेस कम्युनिकेशन वेच्या उभारणीनंतर वर्धेच्या ड्रायपोर्टमधील माल जेएनपीटीमध्ये केवळ सहा तासात पोहोचविणे शक्य होणार आहे. (विशेष प्रतिनिधी)>प्रकल्प उभारणीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चाकेंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात या आधीच सदर प्रकल्पाच्या उभारणीबाबत चर्चा झाली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात गोडाऊन्स, कोल्ड स्टोअरेज, पॅकिंग, कस्टम क्लिअरन्स आदी सुविधा असतील. विदर्भाच्या विविध भागातून औद्योगिक आणि कृषी मालाची निर्यात या ड्रायपोर्टमधून होईल. येथून माल मुंबईत जेएनपीटीमध्ये नेला जाईल आणि तेथून निर्यात होईल. आयात केलेला माल जेएनपीटीतून वर्धेच्या ड्रायपोर्टमध्ये येईल आणि तेथून तो वितरित होईल.
वर्ध्याचा ड्रायपोर्ट लागणार मार्गी
By admin | Published: May 18, 2016 5:37 AM