पुणे/सोलापूर : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गतवर्षीप्रमाणेच संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांसह १० मानाच्या पालख्या एसटी बसमधून विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनाला पंढरपूरला जाणार आहेत. पुण्यात कोरोना आढावा बैठक झाल्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी ही माहिती दिली.
यंदा किमान काही पालख्यांना प्रातिनिधिक स्वरूपात पायी वारी घेऊन जाण्यास परवानगी द्यावी, असा आग्रह विश्वस्त आणि वारकरी मंडळींनी केला होता. यातून मार्ग काढण्यासाठी विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील एक समिती स्थापन केली होती. या समितीने आपला अहवाल राज्य शासनाला सादर केला.
पादुकांसोबत ६० जण गतवर्षीच्या तुलनेत पालखी प्रस्थान सोहळा व वारीमध्ये उपस्थितांची संख्या दुप्पट करण्यात आली आहे. एका पालखीसोबत ६० वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. तर पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी देहू आणि आळंदी येथे प्रत्येकी शंभर लोकांच्या उपस्थितीस परवानगी देण्यात आली आहे.
अहवालानंतरच निर्णय याबाबत नेमलेल्या समितीने आपला अहवाल राज्य शासनाला सादर केला. या अहवालावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यंदादेखील आषाढी वारी एसटी बसमधून घेऊन जाण्यास परवानगी देण्यात आल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.
पालखी सोहळ्याबाबत असे झाले निर्णय- देहू, आळंदीसह राज्यातील १० मानाच्या पालख्यांनाच परवानगी.
- देहू-आळंदी येथील पालखी प्रस्थान सोहळ्यास प्रत्येकी शंभर लोकांचीच उपस्थिती.एका पालखीसोबत दोन एसटी बस व ३०-३० वारकरी, भाविक जाऊ शकतात.यंदादेखील पायी पालखी सोहळा, वारीला परवानगी नाही.
मानाच्या १० पालख्या- संत ज्ञानेश्वर महाराज, आळंदी- संत तुकाराम महाराज, देहू- संत निवृत्ती महाराज, त्र्यंबकेश्वर- संत सोपानकाका महाराज, सासवड- संत मुक्ताबाई, मुक्ताईनगर- संत नामदेव महाराज, पंढरपूर- संत एकनाथ महाराज, पैठण- रुक्मिणीमाता, कौंडण्यपूर-अमरावती- संत निळोबाराय, पिंपळनेर-पारनेर अहमदनगर- संत चांगावटेश्वर, महाराज, सासवड