प्रभू पुजारी/ लोकमत न्यूज नेटवर्कपंढरपूर : आषाढी एकादशीदिवशी पांडुरंगाचे दर्शन घेऊन, सुखसोहळा डोळ्यात साठवून भाविक परतीच्या प्रवासाला लागले़ पण ‘कन्या सासुराशी जाये, मागे परतुनि पाहे।तैसे झाले माझीया जीवा, केव्हा भेटसी केशवा।।’या अभंगाप्रमाणे पांडुरंगाची पंढरी सोडून जाण्याच्या हुरहुरीने अनेक भाविकांचे मन दाटून आले.सावळ्या विठुरायाच्या भेटीची आस मनी घेऊन, आषाढी वारीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आठ लाखांपेक्षा अधिक भाविक पंढरपुरात दाखल झाले होते़ भाविकांनी पवित्र चंद्रभागेत स्नान करून, पांडुरंगाचे दर्शन (पददर्शन, मुखदर्शन, नामदेव पायरी आणि कळस दर्शन) घेऊन हा सुखसोहळा डोळ्यात साठविला. काही भाविक मंगळवारी, तर काही बुधवारी आपले गाठोडे बांधून परतीच्या प्रवासाला लागले़ त्यामुळे पंढरपुरातील गर्दी ओसरू लागली आहे, तरीही दर्शनरांगेत अजून हजारोंच्या संख्येने भाविक उभे आहेत़ शहरातून बाहेर जाण्यासाठी शिवाजी चौक ते स्टेशन रोड, सोलापूर मार्गावरील पुलावर, तीन रस्ता, गोपाळपूर रस्ता, करकंब रस्ता, रेल्वे स्टेशन, चंद्रभागा बसस्थानक आदी ठिकाणी वारकऱ्यांची दाटी झाली होती़ आषाढी एकादशीदिवशी रात्री १२ ते ३ पर्यंत तीन तास नित्यपूजा, शासकीय पूजेसाठी पददर्शन बंद ठेवण्यात आले होते़ मात्र, द्वादशीला पहाटे केवळ नित्यपूजेसाठी तासभर दर्शनरांग बंद ठेवण्यात आली होती़ तुलनेने दोन तास अधिक वेळ दर्शन सुरू असल्याने, एकादशीपेक्षा द्वादशीला बुधवारी अनेक भाविकांनी दर्शन घेतले.प्रसादाच्या दुकानांमध्ये गर्दीपरतणाऱ्या वारकऱ्यांनी प्रसाद म्हणून पेढा, चुरमुरे, बत्ताशे, हळदी-कुंकू, बुक्का खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये गर्दी केली होती. अनेकांनी घरातील बालगोपाळांसाठी टाळ किंवा खेळणी घेतली़ महिला भाविक समई, पणत्या, पंचपाळ यासह संसारिक साहित्याची खरेदी करताना दिसत होत्या.
वारकरी परतीच्या प्रवासाला...
By admin | Published: July 06, 2017 4:24 AM