नागोठणे : उत्पती एकादशीनिमित्त २५ नोव्हेंबरला ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदीत यात्रा संपन्न होत आहे. माऊलींचे दर्शन घेण्यासाठी विविध ठिकाणांहून वारकरी मंडळींच्या दिंडींनी आळंदीकडे प्रस्थान केले आहे. येथील ज्ञानेश्वर मंदिरातून ह.भ.प. नामदेव महाराज यादव (तामसोली), ह.भ.प. मारुती महाराज कोल्हटकर (तळवली), ह. भ. प. दगडूमहाराज दळवी (वांगणी) यांच्या नेतृत्वाखाली शुक्र वारी सकाळी दिंडीने आळंदीकडे प्रस्थान केले असून त्यात नागोठणे आणि मेढे विभागातील शेकडो भाविक सहभागी झाले आहेत.पेण तालुक्यातील तरशेत संत सेवा मंडळाच्या वतीने काढण्यात आलेल्या दिंडीने सुद्धा शुक्रवारी तरशेत येथून दिंडीप्रमुख ह.भ.प. निवासमहाराज शिंदे, ह. भ. प. शांताराम महाराज मेस्त्री आणि चिंतामण महाराज घासे यांच्या नेतृत्वाखाली प्रस्थान केले. त्यात सुद्धा शेकडो वारकरी सहभागी झाले आहेत. वडखळ - पेणमार्गे जाणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांसाठी दुपारी पळस येथे प्रसादाचे भोजन ठेवण्यात आले होते. ह. भ. प. हिराजीमहाराज शिंदे, शिवराम शिंदे आणि ग्रामस्थांनी पळस येथे दिंडीचे स्वागत केले. या दिंडीत विभागातील तरशेत, जांभुळतेप, मुंढाणी, शिहू, चोळे, गांधे, आमराई, बेणसे, धुळवड, शेतजुई आदी गावांतील वारकरी सहभागी झाले आहेत. ह. भ.प. हरिश्चंद्र महाराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी १९ नोव्हेंबरला खारपाले येथील गुरु कुलातून निघणाऱ्या दिंडीचे आळंदीकडे प्रस्थान होणार आहे. या दिंडी सोहळ्यात खारपाले, देवळी, पेण, तुरमाळ, चरी - पळी, पळस, वाघळी, तळवली, तिसे, कामथ, रु द्रवली, कोलाड, पाटणूस, बिहरीची वाडी, डोंबिवली, लालडोंगर, नरखेड (सोलापूर) बिडवाडी, पिसे कामते, कणकवली (सिंधुदुर्ग) आदी ठिकाणच्या श्री गणेश सत्संग मंडळाचे वारकरी सहभागी होणार आहेत. या दिंडी सोहळ्यात वस्तीच्या ठिकाणी दररोज रात्री ह. भ.प. हरिश्चंद्र महाराज पाटील यांचे ज्ञानेश्वरीवर प्रवचन होणार आहे. (वार्ताहर)
वारकरी निघाले आळंदीला
By admin | Published: November 19, 2016 3:13 AM