Maharashtra Politics: काँग्रेस नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आले आहेत. महाविकास आघाडीने मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात अमोल किर्तीकरांना उमेदवारी दिल्यामुळे निरुपम नाराज आहेत. दरम्यान, आता त्यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. संजय निरुपम यांना पक्षातून बडतर्फ करण्याचा प्रस्ताव काँग्रेसच्या बैठकीत घेण्यात आला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनीदेखील निरुपम यांच्यावर कारवाई होणार असल्याचे म्हटले आहे.
नाना पटोले यांनी बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, संजय निरुपम यांचे नाव स्टार प्रचारकांच्या यादीत होते, पण आता आम्ही त्यांचे नाव काढले आहे. ज्याप्रकारे त्यांची वक्तव्ये येत आहेत, पक्षाकडून त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे. दरम्यान, नाना पटोले यांच्या वक्तव्यानंतर संजय निरुपम यांनी एक ट्विट करुन त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
काय म्हणाले निरुपम?संजय निरुपम यांनी ट्विट करुन म्हटले की, काँग्रेस पक्षाने माझ्यासाठी जास्त उर्जा आणि स्टेशनरी वाया घालवू नये. त्याऐवजी काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्या खुर्च्या आणि उर्जेचा उपयोग पक्ष वाचवण्यासाठी करावा. अगोदरच काँग्रेस पक्ष भीषण आर्थिक संकटात आहे. मी काँग्रेस पक्षाला एक आठवड्याचा वेळ दिला होता, तो आज पूर्ण झाला. उद्या मी स्वत: निर्णय जाहीर करेन, असे संजय निरुपम यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
संजय निरुपम यांची उघडपणे टीकासंजय निरुपम उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून उमेदवारीसाठी आग्रही होते, पण ठाकरे गटाने या मतदारसंघातून उमेदवार जाहीर केल्यामुळे निरुपम नाराज आहेत. यामुळे ते ठाकरे गटाच्या उमेदवारावर सातत्याने टीका करत आहेत. अमोल कीर्तिकर यांच्यावर खिचडी घोटाळ्याचे आरोप आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी प्रचार करणार नाही, अशी भूमिका निरुपण यांनी घेतली आहे. दरम्यान, ते शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचीदेखील राजकीय वर्तुळात चर्चा आहे.