चिकणघर : ‘महावितरण’च्या अभियंत्याच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या वरिष्ठांवर कारवाई न केल्यास विजेशी निगडित राज्यातील तिन्ही कंपन्यांचे १२ हजार अभियंते कोणत्याही क्षणी राज्यव्यापी संपावर जातील, अशा इशारा सबोर्डिनेट इंजिनीअर असोसिएशनने ‘महावितरण’ला दिला आहे. तशी नोटीस कंपनी प्रशासनाला दिली, अशी माहिती कल्याण परिमंडळाचे सहसचिव श्रीनिवास बोबडे यांनी गुरुवारी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे. सोलापूरच्या मोहोळ येथील ‘महावितरण’चे उपकार्यकारी अभियंता विकास पानसरे यांनी प्रशासनाच्या दडपशाही व जाचाला कंटाळून २९ डिसेंबरला आत्महत्या केली. या आत्महत्येस त्यांचे कार्यकारी अभियंता आणि अधीक्षक अभियंता जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात निलंबनाची कारवाई करावी, या मागणीसाठी संघटनेने ३ जानेवारीपासून प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यव्यापी धरणे आंदोलनही छेडले आहे. मात्र, प्रशासन दखल घेत नसल्याने कर्मचारी कोणत्याही क्षणी संपावर जातील, असा इशारा पत्रकात दिला आहे.‘महावितरण’च्या कल्याण झोनसमोर गुरु वारी झालेल्या धरणे आंदोलनात कमलेश परदेशी, सुदर्शन कांबळे, रवींद्र नाहिदे, सुरेश खडतरे, नितीन दुफारे आणि एसईएचे अध्यक्ष संजय ठाकूर उपस्थित होते. शुक्र वारी अभियंता संघटनेने पुकारलेल्या एकदिवसीय सामूहिक रजा आंदोलनात कल्याण परिमंडळातील सर्व अभियंते सहभागी झाले होते. या वृत्तास कल्याण ‘महावितरण’चे जनसंपर्क अधिकारी पवार यांनी दुजोरा दिला. (वार्ताहर)
वीज अभियंत्यांचा संपावर जाण्याचा इशारा
By admin | Published: January 07, 2017 4:01 AM