मुंबई - केंद्र सरकारने Tiktok या चायना अॅपवर बंदी घातली असली तरीसुद्धा आज ही या अँपचे अनेक वापरकर्ते व चाहते इंटरनेटवर आहेत. याचा फायदा घेण्यासाठी सायबर भामट्यांनी एक फेक Tiktok Pro लिंक बनविली आहे. त्यापासून सावधानता बाळगावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांनी केले आहे. तसेच, नागरिकांना या फेक लिंकपासून सावधानता बाळगण्याचे आवाहन करताना काही महत्वाच्या सूचनाही केल्या आहेत.
गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर भारत आणि चीन यांच्यातील तणाव वाढल. सीमारेषेवरील या रक्तरंजित संघर्षात देशाचे २० जवान शहीद झाल्याने चीनविरोधात संतापाची लाट पसरली. चीनच्या कुरापतींना आर्थिक झटका देण्यासाठी भारताने राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य देता टिकटॉकसह ५९ चिनी अँप्सवर बंदी आणली. सरकारने घेतलेल्या या निर्णयाने चीनला दणका बसला. सरकारने Tiktok सहित अन्य ५८ अँपवर बंदी घातली आहे. परंतु चाहते इंटरनेटवर आहेत. याचा फायदा घेण्यासाठी सायबर भामट्यांनी उपरोक्त फेक लिंक बनवली असून त्याचा प्रसार व्हाट्सअँप मेसेजेस व sms वर केला जातो. तुमची सर्व माहिती सायबर भामट्यांकडे जाते. त्या मेसेजचा एक प्रकार खालील प्रमाणे आहे.
नेटीझन्सना महाराष्ट्र सायबरकडून सूचना
नेटीझन्स युजर्संने apk फाईल्स डाऊनलोड करु नये, ज्या लिंकमधून बॅन करण्यात आलेल्या कुठल्याही अॅपचा संदर्भ देण्यात येतो.
आपणास तसा मेसेज आल्यास तो डिलीट करा आणि इतरही कोणाला फॉरवर्ड करु नका
गुगल प्ले स्टोअरवर असं कुठलंही अॅप अस्तित्वात नाही, त्यामुळे आपण संबंधित लिंक डाऊनलोड करण्याचा प्रयत्न करु नका.