लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: एका खटल्याच्या सुनावणीला अनुपस्थित राहिल्याबद्दल खासदार व आमदारांसाठी असलेल्या विशेष न्यायालयाने विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर व पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केले.
वीज दरांमध्ये वाढ केल्याने बेस्ट महाव्यवस्थापकांच्या कार्यालयात आंदोलनावेळी त्यांना मारहाण केल्याच्या आरोपा प्रकरणी राहुल नार्वेकर व लोढा यांच्यावर गुन्हा दाखल आहे. संबंधित प्रकरणी पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले असून, खटला आरोप निश्चितीच्या टप्प्यावर आहे. मात्र, नार्वेकर व लोढा खटल्याला अनुपस्थित राहात असल्याने आरोप निश्चितीची प्रक्रिया खोळंबली आहे.
सर्व आरोपी गैरहजर राहिल्याने आरोपी भाजपचे आमदार आहेत की मुंबई महापालिकेचे नगरसेवक आहेत, हे न्यायालय तपासू शकले नाहीत. विधानसभेच्या पुढील वेळापत्रकाबाबत बैठक सुरू असल्याने नार्वेकर विधानसभेत आहेत. त्यामुळे त्यांना १५ मिनिटे उशीर होईल, अशी माहिती शुक्रवारी नार्वेकरांच्या वकिलांनी न्यायालयाला दिली. त्यावर ‘मी काय करावे, तुम्हीच सांगा. मी पुरेशी संधी दिली. त्यांना कॉल करून बोलवा, आम्ही वॉरंट रद्द करू,’ असे म्हणत न्यायालयाने नार्वेकर व लोढा यांच्यावर जामीनपात्र वॉरंट जारी केले.