जितेंद्र कालेकर / ठाणेइफेड्रीनची देशविदेशांत तस्करी केल्याप्रकरणी बॉलीवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी आणि तिचा कथित पती विकी गोस्वामी या दोघांविरुद्ध अखेर ठाणे न्यायालयाने विनाजामीन अटक वॉरंट जारी केले आहे. तब्बल दोन हजार कोटींच्या इफेड्रीन तस्करीप्रकरणी ममता आणि विकी यांच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस बजावण्यासाठी त्यांचे अटक वॉरंट जारी करण्याची ठाणे पोलिसांनी केलेली मागणी ग्राह्य धरून जिल्हा न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश एच.एम. पटवर्धन यांनी सोमवारी सायंकाळी हे आदेश दिले.आतापर्यंत या प्रकरणी सोलापूरच्या ‘एव्हॉन लाइफ सायन्सेस लि.’ या कंपनीचा माजी संचालक मनोजजैनसह गुजरातच्या माजी आमदाराचा पुत्र किशोर राठोड, पुनीत श्रींगी आणि जयमुखी आदी १५ जणांना ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये दोन नायजेरियन नागरिकांचाही समावेश आहे. जैन याच्यासह १५ जणांविरुद्ध ठाणे जिल्हा न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. जैन आणि कंपनीचा सल्लागार पुनीत श्रींगी यांनी कशा प्रकारे कोट्यवधी रुपयांच्या सुमारे १०० किलो इफेड्रीनची तस्करी केली, याबाबतचे अनेक पुरावे या आरोपपत्रात जोडले आहेत. जैन याने पुनीतसह या सर्वांना हाताशी धरून कंपनीतील इफेड्रीन बाहेर काढले. आंतरराष्ट्रीय ड्रगमाफिया विकीच्या मदतीने केनिया तसेच दक्षिण अफ्रिकेत या मालाची तस्करी केली. हवालामार्फत त्यासाठी त्यांनी करोडो रुपये स्वीकारले. याशिवाय, मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि सोलापूर आदी परिसरात इफेड्रीनची मोठी तस्करी केली. १४ एपिल २०१६ रोजी सोलापूरच्या एव्हॉन कंपनीवर पोलिसांनी छापे टाकून जयमुखी, विकी तसेच ममता कुलकर्णी यांच्याविरुद्ध पुरावे गोळा केले आहेत. याच पुराव्यांच्या आधारे आता ठाणे न्यायालयाने त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. इफेड्रीनच्या तस्करीत विकीसह ममताचाही सहभाग असून, ती अनेक बैठकांना त्याच्यासोबत हजर असल्याची माहिती जयमुखीच्या जबाबातून पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी तिच्या अंधेरी येथील घरातून तिचा ठावठिकाणा जाणून घेण्याचा प्रयत्न केला; परंतु, तो मिळाला नाही. केनिया आणि टांझानियात इफेड्रीनवर प्रक्रिया करून मेथ एन्फाटामाइन हा ‘आइस’ नावाचा मादक पदार्थ बनवून त्याची इतर देशांमध्ये तस्करी केल्याचा विकी आणि ममतावर आरोप आहे. हे दोघेही परदेशात असल्याची शक्यता गृहीत धरून त्यांच्यावर रेड कॉर्नर नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. - भरत शेळके, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे अन्वेषण विभाग, ठाणे शहर
ममता कुलकर्णीविरोधात अटक वॉरंट
By admin | Published: March 28, 2017 4:07 AM