- रवींद्र देशमुख
मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी आणि सत्ताधारी अशीच लढत पाहायला मिळाली. या निवडणुकीतही लोकसभेप्रमाणे केंद्रस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवारच होते. तर पवारांच्या खेळींना चोख प्रत्युत्तर देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मजल दर मजल करत निवणुकीला सामोरे गेले. पवारांचा प्रदीर्घ अनुभव फडणवीसांना काही अशी त्रासदायक ठरत असला तरी मागील काही दिवसांतील घडामोडींवर मुख्यमंत्र्यांच्या काही चाली पवारांच्या घरातूनच चालू होत्या हे आता सिद्ध झालं आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर विरोधी पक्षाला आलेली मरगळ आणि दिग्गज नेते सोडून गेल्यामुळे गलीगात्र झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसलाशरद पवार यांनी उभारी देण्याचे काम केले. पवारांच्या झंझावाती दौऱ्यांमुळे तरुणांमध्ये पवारांविषयी आकर्षण वाटू लागले. त्यातच ईडीची नोटीस आल्यामुळे पवारांना पाठिंबा वाढू लागला. याचा फायदा राष्ट्रवादीला होणार हे जवळजवळ निश्चित होते. पण दुसऱ्याच दिवशी माशी शिंकली आणि सर्वकाही धुळीस मिळाले.
ईडी प्रकरणामुळे वृत्तवाहिन्यांवर पवार...पवार...पवार असं सुरू असताना अजित पवारांनी राजीनामा दिला. बर मुदत संपणारच होती, तर मग राजीनामा देऊन काय साध्य कारायचं होतं, याच उत्तर अखेरपर्यंत मिळाले नाही. मात्र तोपर्यंत राष्ट्रवादी पक्षाच्या निवडणुकीतील वाटचालीचे जे काही 'डॅमेज' व्हायचं होतं ते होऊन गेलं. हीच भाजपला अजित पवारांची पहिली मदत होती.
हे झालं असताना बाळासाहेब ठाकरेंच्या अटकेचा मुद्दा उपस्थित करून पक्षातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळांना टार्गेट करण्याची उठाठेव अजित पवारांनी केली. त्यानंतर भुजबळ यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत अजित पवारांना टोला लगावला. विधानसभेसाठी शरद पवारांनी तयार केलेल्या पोषक वातावरणाचा 'टेंपो' अजित पवारांनी राजीनामा देऊन घालवल्याचे त्यांनी नमूद केले. अर्थात ही भावना संपूर्ण राष्ट्रवादी पक्षातच होती.दरम्यान काकांविषयची आदर आणि आपल्या हातून झालेल्या चुकांचा पश्चाताप म्हणून अजित पवारांनी मुदत संपत आलेल्या पदाचा राजीनामा दिला हे एकवेळ समजू शकतो. पण तिकीट वाटपात पुणे जिल्ह्यात अजित पवारांकडून गोंधळ नक्कीच लपून राहणारा नव्हता. पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. तेथून लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे हे विद्यमान आमदार आहेत. राष्ट्रवादीत असताना दोघेही अजित पवारांच्या मर्जीतले. येथील तीनही विधानसभेच्या जागांवर तिकिट वाटपात अजित पवारांनी घोळ घातला. पिंपरीचं तिकिट आधी नवख्या नगरसेविकेला जाहीर केलं. त्यानंतर अण्णा बनसोडेंनी बंडखोरी करण्याचे जाहीर केल्यावर नगरसेविकेचं तिकिट कापून बनसोडेंना दिलं. चिंचवडमध्ये पक्षाच्या अधिकृत उमेदवाराने अर्ज दाखल केला, पण त्याला एबी फॉर्म उशीरा दिला, त्याचा फॉर्म बाद झाला. तिथे शिवसेनेच्या बंडखोर उमेदवाराला राष्ट्रवादीने पाठिंबा दिला. भोसरीमध्ये राष्ट्रवादीच्या विलास लांडेंना अपक्ष उभे करून पक्षाने त्यांना पुरस्कृत केलंय. अशी खेळी करण्याचा अजित पवारांना पूर्वानुभव आहे. परंतु, ती वेळ खेळी करण्याची नक्कीच नाही. तिथही पवारांनी राष्ट्रवादीला मागे आणण्याचा प्रयत्न केला होता.
सांगोल्यातही अशीचीच किरकीरी झाली. 'शेकाप'ला जागा सोडलेली असताना तिथं राष्ट्रवादीचा उमेदवार दिला. करमाळ्यात अपक्ष संजय शिंदेंना पाठिंबा देत राष्ट्रवादीच्या उमेदवारशी संबंध नसल्याचं जाहीर केले. विशेष म्हणजे संजय शिंदे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहेच. या घडामोडींमुळे अजित पवारांची तिरकी चाल पुन्हा एकदा अधोरेखीत झाली.
एकूणच मागील काही दिवसांतील हालचालींवरून भाजपला मदत करण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश करायलाच पाहिजे असं काही नाही, हे अजित पवारांच्या बंडखोरीमुळे स्पष्ट झाले आहे. परंतु, हे सगळ करण्यासाठी त्यांची मजबुरी नेमकी ईडी, मंत्रीपद की तुरुंगवारीची भिती यापैकी काय आहे, हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे.