पहाटेच्या शपथविधीला जयंत पाटील होते?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितला किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 05:37 PM2022-08-25T17:37:14+5:302022-08-25T17:37:47+5:30
देवेंद्र एकटे मुख्यमंत्री होते. मी त्यांच्या मंत्रिमंडळात होतो. एकटा माणूस सगळ्या विरोधकांना पुरून उरायचा. आता तर आम्ही दोघे आहोत असा टोला मुख्यमंत्री शिंदेंनी लगावला.
मुंबई - अजित पवारांनी सकाळी घाई केली. सबुरीने घेतले असते तर कार्यक्रम करेक्ट झाला असता. जयंतराव, मला बोलले, चुकीचा कार्यक्रम झाला. मला माहिती दिली असती तर करेक्ट कार्यक्रम केला असता. त्यावेळी मला आमच्या प्रमुखांचा फोन आला तेव्हा मी जयंत पाटील फोन उचलत नाहीत असं सांगितले. मी बोललो जयंत पाटील तिथेच आहे असा किस्सा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितला.
नेमकं काय घडलं?
अजित पवारांच्या विधानांवर मुख्यमंत्री सभागृहात उत्तर देत होते. त्यावेळी ते म्हणाले की, अजितदादा तुम्ही घाई केली. तेव्हा मला आमच्या प्रमुखांचा फोन आला. अरे टीव्ही बघितली का? तर मी पाहिलं तेव्हा दादा शपथ घेत होते. मला वाटलं मागचे कधीचं दाखवतायेत. तर नाही हे आत्ताचं आहे असं मला सांगितले. मला विचारलं, अरे काय चाललंय. जयंतरावांना मी फोन करतोय ते फोन उचलत नाही. तेव्हा अनिल पाटील पाठमोरे उभे होते. मला वाटलं जयंत पाटील तिथेच आहे. पण ते जयंत पाटील नव्हते. जयंत पाटील पण गेलेत असं मी सांगितले. तुम्ही गेला असता तर कार्यक्रम ओक्केच झाला असता असा टोला मुख्यमंत्री शिंदेंनी राष्ट्रवादीला लगावला.
त्याचसोबत जयंतरावांकडे सभागृहात बोलण्याचे मुद्दे नव्हते. त्यामुळे त्यांनी राजकीय भाषण केले. आम्ही सगळ्यांकडे लक्ष देतोय. अजित पवारांना मी काही गोष्ट सांगत होतं. त्यांनी लक्ष दिलं असतं तर बरे झाले असते. ५० आमदारांकडे आम्ही लक्ष देतोय. तुमच्याही लोकांवर माझं लक्ष आहे. त्यांनाही मदत केली जाईल. काळजी करू नका असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.
मुख्य बसले होते घरी, तुम्ही चालवत होता बोट
सभागृहात मुख्यमंत्री शिंदेंनी विरोधकांना उत्तर देताना काही कविता, शेरोशायरीही सादर केली. महाविकास आघाडीची बांधली होती मोट, मुख्य बसले होते घरी, तुम्ही चालवत होता बोट, श्रद्धा सबुरीचा सल्ला अजितदादांनी दिला. मी जे काही केले उघडपणे केले. आम्ही श्रद्धा सबुरीनेच वागतोय. नेहमी तुमचं बोलणं, वागणे, वेळापत्रक यावर बोलत असतो. सकाळी सकाळी दादांचं कामकाज सुरु होतं. एकदा मला त्यांनी सकाळी ८ वाजता बोलावलं. पण कसं येणार आम्ही झोपतोच ४ वाजता. त्यामुळे तुमच्याबद्दल मला आदर आहे असं सांगत मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांचं कौतुक केले.
आता एक से भले दो
सत्तेचा ताम्रपट कुणी घेऊन आलं नाही. २५ वर्ष आम्ही सत्तेत राहणार बोलले. २५ वर्ष कुणी पाहिली. कोण आत आहे कोण बाहेर आहे. आम्ही पुढची अडीच वर्ष इतके चांगले काम करणार की त्यापुढील ५ वर्ष इथेच राहणार. आम्ही १०-१५ वर्ष आम्ही बोलणार नाही. मी पुन्हा येईन असं फडणवीस म्हणाले. ते पुन्हा आले पण मलापण सोबत घेऊन आले. आता आम्ही दोघं आहोत. देवेंद्र एकटे मुख्यमंत्री होते. मी त्यांच्या मंत्रिमंडळात होतो. एकटा माणूस सगळ्या विरोधकांना पुरून उरायचा. आता तर आम्ही दोघे. एक से भले दो असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना चिमटा काढला.