यवतमाळ : गावाचे प्रशासन हाकणारे ग्रामसेवक तालुक्याच्या ठिकाणी राहून उंटावरून शेळ्या हाकत आहेत. भोळीभाबडी जनता हा प्रकार वर्षानुवर्षे निमुट सहन करीत आली. मात्र एका गावात संयमाचा हा बांध फुटला आणि चक्क चार महिन्यांच्या दीर्घ दडीनंतर गावात अवतरलेल्या ग्रामसेवकाची गावकऱ्यांनी पाय धुवून आरती केली.
भोळ्या गावकऱ्यांच्या या गांधीगिरीने ग्रामसेवकाचीही पाचावर धारण बसली. हा प्रकार घाटंजी तालुक्यातील कापशी (को) येथे घडला. येथील ग्रामसेवक सुनील दरवे हे २६ जानेवारी रोजी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी गावात आले होते. त्यानंतर त्यांनी जी दडी मारली, तर एप्रिल महिना संपेपर्यंत ते कापशीकडे फिरकलेही नाही. दरम्यानच्या काळात या ग्रामपंचायतीवर प्रशासक बसविण्यात आले. घाटंजी पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्याकडे कारभार गेला. मात्र विस्तार अधिकारीही कधीच गावाकडे फिरकला नाही. ना सरपंच ना ग्रामसेवक ना प्रशासक अशा परिस्थितीत कोरोना सारखी गंभीर परिस्थिती उद्भवली आहे.
यातच शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न खोळंबले आहेत. त्यामुळे गावकरी ग्रामसेवकाची चातकासारखी वाट पाहून संतापले होते. त्यातच मंगळवारी ग्रामसेवक येताच गावकऱ्यांनी त्यांची आरती केली. त्यांचे पाय धुवून पुष्पगुच्छ दिले. मात्र, ही गांधीगिरी करतानाच गावकऱ्यांनी ग्रामसेवकाला गैरहजेरीबद्दल खडसावून जाबही विचारला.
अन्य महत्वाच्या बातम्या...
IFSC केंद्र नेमके आहे तरी काय? गिफ्ट सिटीचा मालक कोण? जाणून घ्या...
तबलिगींच्या दानाचे केले गुणगाण; 'त्या' आयएएस अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस
"भारत आणि बंगालदरम्यान काहींना युद्ध हवेय"; ममता बॅनर्जींवर जावडेकरांचा गंभीर आरोप
लॉकडाऊनमध्ये नशेत वेगाने कार घेऊन तरुण बेडरूममध्ये घुसला अन्...