वाशिम : रिसोड तालुक्यातील देगाव येथील एका निवासी शाळेतील ४ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व वसतिगृहात राहणारे २२९ विद्यार्थी दोन दिवसांत कोरोनाबाधित आढळून आल्याने जिल्हावासियांची चिंता अधिकच वाढली आहे. दरम्यान, २४ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी निवासी शाळेला भेट देवून येथील परिस्थितीचा आढावा घेतला.
देगाव येथे निवासी शाळा असून, चार शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि वसतिगृहात राहणारे २२९ विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने या शाळेचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र (कन्टेन्मेंट झोन) घोषित करण्यात आला आहे. बाधित आढळलेले सर्व विद्यार्थी शाळेच्या वसतिगृहात निवासी स्वरुपात राहणारे आहेत. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील १५१, यवतमाळ जिल्ह्यातील ५५, वाशिम जिल्ह्यातील ११, बुलडाणा जिल्ह्यातील ३, अकोला जिल्ह्यातील १, हिंगोली जिल्ह्यातील ८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
शाळेमध्ये निवासी स्वरुपात राहणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी जे विद्यार्थी निगेटिव्ह आहेत, त्यांची संपूर्ण व्यवस्था स्वतंत्र ठेवण्यात आली तसेच बाधित आढळलेल्या विद्यार्थ्यांच्या संपर्कात आलेले इतर स्थानिक विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची कोरोना चाचणी केली जाणार आहे.