इंझोरी: जिल्ह्यात मासेमारीसाठी प्रसिद्ध असलेल्या अडाण प्रकल्पात संबंधित कंत्राटदार नियम डावलून परराज्यातील मच्छिमारांकडून मासेमारी करून घेत आहे. त्यामुळे स्थानिक मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली असून यासंदर्भात त्यांनी मत्स्यव्यवसाय विभागाच्या प्रादेशिक आयुक्तांकडे तक्रार करून न्याय देण्याची मागणी केली आहे.
वाशिम जिल्ह्यात मध्यम प्रकल्पांपैकी महत्त्वपूर्ण म्हणून मानोरा तालुक्यातील अडाण प्रकल्प ओळखला जातो. या प्रकल्पातील माशांना मोठी मागणी आहे. सदर प्रकल्पात मत्स्य उत्पादन करून मासेमारी करण्यासाठी लिलाव प्रक्रियेद्वारे कंत्राट देण्यात येते. यासाठी लाखो रूपयांची बोलीही लागते. या प्रकल्पावर ३०० हून अधिक स्थानिक मच्छिमारांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. अडाण प्रकल्पाचे कंत्राट घेणाऱ्याला मासेमारीसाठी स्थानिक मच्छिमारांनाच प्राधान्य द्यावे लागते. कंत्राटाच्या करारनाम्यावरच ही तरतूद नमूद आहे. परंतु यंदा या प्रकल्पाचे कंत्राट घेणाऱ्या कारंजा येथील सहकारी संस्था हा नियम डावलून परराज्यामधील मच्छिमारांकडून अडाण प्रकल्पात मासेगामारी करून घेत आहे. त्यामुळे या प्रकल्पावर अवलंबून असलेल्या ३०० पेक्षा अधिक मच्छिमारांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे. या मच्छिमारांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन राज्याबाहेरील मच्छिमारांकडून होत असलेली मासेमारी बंद करण्याची मागणीही केली. परंतु त्यांनी त्या मागणीची दखल घेतली नाही. त्यामुळे हताश झालेल्या स्थानिक मच्छिमारांनी न्यायासाठी थेट मत्स्यव्यवसाय विभाग वाशिमच्या सहाय्यक आयुक्तांसह प्रादेशिक उपायुक्त, पालकमंत्री,आमदार यांच्याकडे तक्रार केली आहे.