ऑनलाइन लोकमत -
१५०० कोटीच्या प्रस्तावास मान्यता, खा. गवळींच्या प्रयत्नाला यश
वाशिम, दि. 23 - नॅरोगेज मार्गाने धावणारी शकुंतला रेल्वे आता ब्रॉडगेज मार्गावरुन धावणार आहे. गरिबांचा रथ म्हणून सुपरिचित असणारी ब्रिटीशकालीन शकुंतला रेल्वे आता देशी स्वरुपात जनतेची सेवा करण्याच्या दृष्टीने रेल्वे मंत्रालयाने १५०० कोटी रुपयांच्या ब्रॉडगेज प्रस्तावास २२ जुलै २०१६ रोजी मान्यता दिली आहे. यासाठी खासदार भावना गवळी यांनी केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.
विदर्भातील सोनं लुटण्यासाठी सन 1913 मध्ये मुर्तिजापूरपासून यवतमाळपर्यंत इंग्रजांनी सुरु केलेली शकुंतला रेल्वे शंभरी गाठल्यानंतर बंद पाडण्याच्या अवस्थेमध्ये येवून ठेपली होती. ही रेल्वे बंद पडू नये याकरीता भावना गवळी यांनी २००५ पासून केंद्र शासनाच्या रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश येवून २२ जुलै रोजी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी १५०० कोटी रुपयांच्या शकुंतलेच्या नॅरोगेजचे ब्रॉडगेजमध्ये रुपांतर करावयाच्या कामांना मंजुरात प्रदान केली आहे.