ऑनलाइन लोकमत
देपूळ (वाशिम), दि. १ - पोळ्याच्या पुर्वसंध्येला बैलाची खांदेमळण करून शेतात गेलेले शेतकरी संपत भिकाजी शिंदे (रा. वारा जहाँगीर) यांचा १ सप्टेंबरच्या सकाळी पूस नदीपात्रात मृतदेह आढळून आला. सततची नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून वडिलांनी आत्महत्या केली, अशी फिर्याद मृतकाच्या मुलाने पोलिस ठाण्यात नोंदविली आहे.
फिर्यादीत पुढे नमूद केले आहे, की माझे वडिल संपत शिंदे (वय ४५ वर्षे) यांच्याकडे चार एकर शेती असून कुटूंबात पत्नी, तीन मुले व एक विवाहयोग्य मुलगी आहे. गेल्या तीन ते चार वर्षांपासूनची नापिकी, कर्जबाजारीपणा तसेच यावर्षी पीक परिपक्वहोतानाच्या अवस्थेत पावसाने मारलेली दडी, यामुळे नैराश्य आल्याने त्यांनी पूस नदीला आलेल्या पुरामध्ये उडी घेउन आत्महत्या केली असावी, असे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी अधिक तपास ठाणेदार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस जमादार के.एच.वाणी करित आहेत.