नाशिक : नाशिक-मुंबई महामार्गावरील कसारा घाटामध्ये वाघाचा रेल्वे रुळावर मुक्त संचाराचा व्हिडिओ व फोटो व्हॉट्सअॅपवरून व्हायरल झाले. पट्टेरी वाघ, रेल्वे रुळ, बोगदा अन् जंगल असा दिसणारा परिसर व्हिडिओत बघून अनेकांनी त्यावर विश्वास ठेवला; मात्र नाशिक पश्चिम वनविभागाच्या इगतपुरी वनपरिक्षेत्राने इगतपुरी रेल्वे अधिक्षकांकडे याबाबत शहनिशा केली असता हा व्हिडीओ जबलपूर रेल्वे मार्गाचा असल्याचे सांगण्यात आले. या माहितीची खातरजमा करण्यासाठी प्रस्तुत प्रतिनिधीने जबलपूर जंक्शनच्या रेल्वे इलेक्ट्रिकल विभागाशी संपर्क साधला असता सदर पोलची खात्री पटली आणि व्हायरल व्हिडिओ कसार्याचा नाही याबाबत शिक्कामोर्तब झाले. जबलपूर रेल्वे विभागप्रमुखांनी हा पोल इटारसी-भोपाल रेल्वे मार्गावर असल्याचे स्पष्ट केले. एकूणच वाघ कसार्यात आला नाही; मात्र नेटिझन्सद्वारे तो व्हॉटसअॅपमार्गे कसार्यापर्यंत पोहचविला गेला.
पट्टेवाला वाघ नाशिक, औरंगाबाद, पुणे परिसरात अद्याप दिसल्याची नोंद वनविभागाकडे नाही. नाशिक जिल्ह्यात बिबट्याचे वास्तव्य आहे; मात्र वाघाच्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा वनविभागाला कुठल्याही भागात आढळलेल्या नाहीत; मात्र मंगळवारी सकाळपासून व्हॉटस्अॅपद्वारे एका व्हिडिओमधून थेट वाघ कसार्यात पोहचला अन् वनविभागापासून तर इगतपुरी तालुक्यासह संपुर्ण नाशिक जिल्ह्यात आणि जवळील ठाणे जिल्ह्यातही नागरिकांमध्ये घबराट पसरली. ‘कसार्याच्या रेल्वे रुळावर वाघाचा मुक्त संचार’ अशा आशयाने हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने सर्वत्र घबराट पसरली आणि नाशिक जिल्ह्यात बिबट्यासोबत वाघाचेही आगमन झाले की काय? अशी शंका घेतली जात होती. याप्रकरणी नाशिक वनविभागाच्या उपवनसंरक्षक टी.बियूला मती यांनी गंभीर दखल घेत इगतपुरी वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश ढोमसे यांना तत्काळ शहनिशा करण्याच्या सुचना दिल्या.ढोमसे यांनी त्वरित कसारा रेल्वे लाईन वर पथकासह हजेरी लावून परिसर पिंजला. तसेच इगतपुरी रेल्वे अधिक्षकांकडे व्हिडिओमध्ये दिसणारा रेल्वे लाईनवरील पोल क्रमांकाबाबत खात्री केली. यावेळी अधिक्षकांनी सदर क्रमांकाचा पोल व बोगदा हा मुंबई-भुसावळ रेल्वे मार्गावर अस्तित्वात नसून हा पोल जबलपूरमधील असल्याचे सांगितले. यानंतर जबलपूर रेल्वेच्या इलेक्ट्रिकल विभागप्रखांनी मात्र याबाबत अधिक खुलासा करुन भोपाल विभागाच्या हद्दीतील इटारसीपासून ३० किलोमीटर अंतरावर हा पोल असल्याचा दावा केला.
रेल्वे रुळालगतच्या विजेच्या पोल क्रमांकवरून पटली खात्रीपट्टेरी वाघाच्या व्हॉटस्अॅपवरील व्हिडिओमधील पोल क्रमांक ७७६/७ व बोगदा दिल्ली-मुंबई रेल्वे मार्गावरील आहे. सदर पोल मध्यप्रदेशमधील भोपाल विभागाच्या हद्दीतील इटारसी-भोपालच्या मार्गावर आहे. बुदनी-बरखेडा या दोन लहान रेल्वे स्थानकाच्या मध्यभागी हा पोल असून इटारसी रेल्वे स्थानकापासून साधारणत: भोपालकडे येताना ३५ किलोमीटरवर हा पोल आहे. या भागात वाघाचे अस्तित्व असून संपुर्ण रेल्वे मार्ग हा जंगलाने वेढलेला असल्याचे जबलपूर जंक्शनच्या इलेक्ट्रिकल विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यानी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले