विरार : अर्नाळा गावात ठिकठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले असून शाळेसमोरील कुंडीतील कचरा निमितपणे उचलला जात नसल्याने कुजक्या दुर्गंधी पसरल्याने विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. विरार पश्चिम येथील अर्नाळा ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या सेंट पीटर चर्च मराठी शाळेच्या समोर असलेली कचरा कुंडी निमितपणे साफ केली जात नाही. परिसरातील नागरिक आपल्या घरातील कचरा बेजबाबदारपणे रस्त्यावर कुंडीबाहेर टाकतात. हा कचरा नियमित उचलला जात नाही. त्यामुळे तो कुजून या परिसरात इतकी दुर्गंधी पसरते की वर्गांच्या दारे-खिडक्या बंद करुन घ्याव्या लागतात. वाऱ्याबरोबर प्लास्टिकच्या पिशव्या व इतर कचरा शाळेच्या आवारात उडून येतो. भूमिगत गटारासाठी टाकलेले पाईपही उघडे आहेत. त्यासाठी खणलेला रस्ताही खड्डेमय झाला आहे. चेंबर खडी कचऱ्याने भरले आहेत.जवळच एस.टी.डेपो असल्याने एस.टी. व पर्यटकांसह विविध वाहनांची वर्दळ चालू असते. या सर्व प्रकारांमुळे विद्यार्थी व शिक्षकांच्या आरोग्याला व जीवाला धोका निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी) >एकीकडे पावसाळ्यात पसरणाऱ्या साथीच्या रोगांची टांगती तलवार डोक्यावर असतानांच त्यात या कचरा व दुर्गंधीची भर पडली आहे. त्यामुळे आरोग्य टिकवावे कसे? असा प्रश्न विद्यार्थी आणि शिक्षकांना पडला आहे.
अर्नाळ्यात कचऱ्याचे साम्राज्य
By admin | Published: July 22, 2016 2:23 AM