नागपूर-
राज्यात आज एका बाजूला ७ हजारहून अधिक ग्राम पंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर होत असताना दुसरीकडे हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत विरोधीपक्ष नेते अजित पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेण्यात आलेल्या निर्णयांना आणि निधीला स्थगिती देण्यात आल्याच्या मुद्द्यावरुन अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारला यावेळी घेरण्याचा प्रयत्न केला. त्यावर उत्तर देताना फडणवीस आणि अजित पवार यांच्यात जुंपली. विधानसभेत गदारोळ झाला मग विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सदस्यांना बसण्याची विनंती केल्यानंतर वाद शमला.
अजित पवार बरसले...विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारने मंजूर झालेल्या अनेक कामंना स्थगिती दिल्याचा दावा केला. यावरुन सभागृहात विरोधकांनी एकच हल्लाबोल केला. "बजेटमध्ये मंजूर झालेली कामं होती, ही महाराष्ट्रातील कामं आहेत. ही काही कर्नाटक आणि गुजरातची कामं नाही", असा असा हल्लाबोल अजित पवारांनी केला. तसंच आम्ही अनेक सरकारं बघितली, मनोहर जोशी, नारायण राणेंचं सरकार बघितलं, देवेंद्रजी तुमचंही सरकार ५ वर्ष बघितलं. सरकार येतात-जातात, तुमची पहिली टर्म आहे, पण आमच्या सात-सात टर्म झाल्या आहेत. पण अशी मंजूर झालेली व्हाईट बूक झालेली कामं कधी थांबली नव्हती", असा घणाघात अजित पवारांनी केला.
राज ठाकरेंचा नितीन गडकरींना फोन, म्हणाले...जनतेला सबबी कशा देणार? आता तुम्हीच...
अजित पवारांनी सरकारला धारेवर धरलं असता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हस्तक्षेप करत प्रश्नोत्तराचा तास सुरू असल्याचं लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला. "सन्माननीय विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा मुद्दा लक्षात आला आहे. तुमच्या मुद्द्याची नोंद घेतली आहे. प्रश्नोत्तराचा तास आहे. आता दोन मिनिटं खाली बसा, आपण कामकाज चालवूया", असं राहुल नार्वेकर म्हणाले.
अजित पवार संतापले...राहुल नार्वेकर अजित पवारांना बसण्याची विनंती करत होते. पण अजित पवार यांनी सरकारवर टीका करणं सुरूच ठेवलं. "अध्यक्ष महोदय हा प्रश्नोत्तराचा तास आहे. आम्हाला प्रश्न विचारण्याचा आणि आमचा मुद्दा मांडण्याचा अधिकार आहे", असं अजित पवार म्हणाले. अध्यक्ष विनंती करत असतानाही अजित पवार खाली न बसल्यानं त्यांचा माईक बंद करण्यात आला होता.
फडणवीस म्हणाले...तुमच्याकडूनच शिकलो!"विरोधी पक्षनेते अजित पवारांनी मुद्दा मांडला, पण मी त्यांना सांगू इच्छितो तुम्ही सात-सात वेळा निवडून आले असाल, आम्ही कमी निवडून आलो. पण काही गोष्टी तुमच्याचकडून शिकलो आहे. ज्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, तेव्हा अजित पवार उपमुख्यमंत्री बनले. त्यावेळी तुम्ही आमची सगळी कामं रोखली, माझ्या मतदारसंघातील कामं तुम्ही रोखली. अनेक वर्ष भाजपच्या लोकांना नवा पैसा दिला नाही. पण आम्ही बदल्याची भावना ठेवणार नाही", असं फडणवीस म्हणाले.
ज्या स्थगिती दिल्या आहेत, त्यापैकी ७० टक्के स्थगिती उठवली आहे, शेवटच्या स्थगिती आहेत, त्या कामांना मंजुरी देताना कोणत्याही तरतुदी पाळल्या नाहीत. नियम न पाळता खर्च केले. त्याचा पुनर्विचार करुन आवश्यक त्या स्थगिती उठवू आणि कुणावरही अन्याय होणार नाही, योग्य आणि आवश्यक निर्णय घेऊ, असंही फडणवीस यांनी सांगितलं.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम