- शिवाजी गोरे, दापोली
कायमस्वरूपी पाण्याचा ओघ असलेले गाव आता मोठ्या मुश्किलीनेच सापडेल. डिसेंबर-जानेवारीपासूनच पाणी कमी होऊ लागते आणि फेब्रुवारीपासून उपलब्ध पाणी फक्त पिण्यासाठीच वापरले जाते. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील आसूद हे गाव मात्र त्याला अपवाद आहे. या गावातल्या ३५0 एकर क्षेत्रातील बागायतीला ३६५ दिवस २४ तास पाणी मिळते. गावात ५00 वर्षांपूर्वीच पाण्याचे असे नियोजन करण्यात आले आहे की, आताही गावाला गुरुत्वाकर्षणाने मुबलक पाणी मिळते.नारळ-पोफळीच्या बागांमुळे ‘आसूद बाग’ या नावाने हे गाव ओळखले जाते. कोकणातील प्राचीन बागांचा उत्कृष्टनमुना येथे पाहायला मिळतो. शेतकऱ्यांनी वर्षाचे ३६५ दिवस २४ तास प्रत्येक मिनिटाचे पाणी नियोजन करून लोकसहभागातून नदीवर बंधारा बांधून गुरुत्वाकर्षणाने पाटाने आणून बागा फुलविल्या आहेत. राज्यात एकीकडे पाण्याचे दुर्भिक्ष असताना गावातील शेतकऱ्यांनी पाणी नियोजनाचा आदर्श घालून दिला आहे.कोकणात धो-धो पडणारे पावसाचे पाणी समुद्राला जाऊन मिळते. त्यामुळे उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष पाहायला मिळते. दरवर्षी अनेक गावे, वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. आसूद गाव मात्र याला अपवाद आहे. वणद आसूद या दोन्ही गावांच्या मध्यभागातून वाहणाऱ्या नदीवर बंधारा घालून २ किलोमीटरवरून पाटाने पाणी आणले जाते. त्यावर बागायती होते.पावसाळा संपल्यानंतर नदीवर शेतकरी श्रमदान करून बंधारा बांधतात. बंधारा बांधणे, पाटाची डागडुजी यासाठी प्रत्येक शेतकऱ्याच्या क्षेत्रफळाप्रमाणे वर्गणी काढली जाते. क्षेत्रफळाप्रमाणेच पाणीवाटप केले जाते. २४ तास पाणीपुरवठा सुरू असतो. प्रत्येकाच्या ठरलेल्या वेळेप्रमाणे त्याने पाणी घ्यायचे असते. पाणी नियोजनाची समिती : नियोजनबद्ध पाणी मिळण्यासाठी एक समिती केली आहे. सर्व ४0 बागायतदार समितीचे सभासद आहेत. वर्षातून एकदा बैठक होते. तासाला ५ रूपये प्रमाणे पाणीवाटप होते. स्वत:च्या वाट्याचे पाणी घेतल्यानंतर प्रवाह बदलून दुसऱ्या शेतकऱ्याला दिला जातो. रात्रीच्या वेळेतही हे काम नियोजनानुसारच होते.- विनोद देपोलकर : अध्यक्ष, पाणी नियोजन समिती