पुणे : ‘पाण्याला कधी कोणाला नाही म्हणू नये,’ अशी प्रत्येकाला लहानपणापासून मिळालेली शिकवण. पण दुष्काळ आणि तीव्र पाणीटंचाईमुळे पुण्यात ही शिकवण विसरल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे. उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असताना शहरातील रस्त्यांवरून जाणाऱ्यांना पिण्यासाठी असणाऱ्या पाणपोईच गायब झाल्या आहेत. एवढेच नव्हे, तर सरकारी कार्यालयांमध्ये, एसटी स्थानके, सार्वजनिक ठिकाणीही येणाऱ्या-जाणाऱ्यांना पिण्याच्या पाण्याची सोयच नसल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीतून दिसून आले आहे.काही वर्षांपूर्वीपर्यंत उन्हाळा सुरू होण्याची चाहूल लागली की शहरात ठिकठिकाणी, रस्त्यांवर, सार्वजनिक स्थळी तात्पुरत्या पाणपोई उभारल्या जात होत्या. त्यामुळे शहरातून जाणाऱ्या पादचाऱ्यांना, वाहनचालकांना तहान लागल्यास या पाणपोर्इंमधून पाणी घेऊन ते पिले जात होते. गणेश मंडळे, सार्वजनिक संस्था, विश्वस्त संस्था यांच्यासह अनेक जण आपल्या प्रियजणांच्या स्मरणार्थ या पाणपोई उभारत असत. यातील बहुतांशी पाणपोई या उन्हाळ्यापुरत्या असत. मोठमोठे काळे रांजण भरून ठेवले जात असत. तर गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी सिमेंटच्या स्थायी पाणपोई उभारल्या जात असत. पण गेल्या दोन-तीन वर्षांपासून या पाणपोर्इंच्या संख्येत कमालीची घट झाली आहे.या वर्षी तर पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळ आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा पाणीपुरवठा नसल्याने शहरात गेल्या सहा महिन्यांपासून ३० टक्के पाणीकपात सुरू आहे. शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे पाणीच पुणेकरांना पुरत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे पाणपोई उभारण्यासाठी कोणीच पुढे येत नसल्याचे चित्र आहे. दररोज पाणी येत नसल्याने आणि प्रत्येक ठिकाणच्या पाणी येण्याच्या वेळा वेगवेगळ्या असल्याने पाणी भरून ठेवण्यासाठी कोणीच पुढे येत नाही. त्यामुळे पाणी महाग झाल्याचे चित्र आहे.> सरकारी कार्यालयांमध्ये पाणीच नाहीपूर्ण राज्याच्या सरकारी कार्यालयांचा गाडा हाकणाऱ्या पुणे स्टेशन येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये येणाऱ्यांना पिण्याच्या पाण्याची कोणतीही सोयच नसल्याचे चित्र आहे. या प्रशासकीय इमारतीमध्ये विविध विभागांनी अनेक कार्यालये आहेत. तेथे राज्याच्या विविध भागांमधून दररोज हजारो लोकांची ये-जा होते. मात्र, अनेकदा तेथे पिण्याचे पाणीच मिळत नसल्याचे दिसून येते. काही विभागांमध्ये पाण्याचे माठ, स्टीलच्या टाक्या भरून ठेवल्या आहेत. मात्र अनेकदा तेथे ग्लास नसणे, अस्वच्छता असे चित्र दिसून आले. पण बहुतांशी विभागांमध्ये येणाऱ्या सर्वसामान्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी कोणतीही सोय नसल्याचे दिसून आले.> एसटी स्थानकांवर प्रवाशांची वणवणशहरातील एसटी स्थानकांवर पिण्याच्या पाण्याची स्वच्छ सोयच नसल्याचे दिसून आले. शिवाजीनगर येथील एसटी स्थानकावर पिण्याच्या पाण्यासाठी कोणतीही सोय नसल्याचे चित्र आहे. तर पुणे स्टेशन येथेही अशीच स्थिती आहे. स्वारगेट येथील स्थानकावर पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. मात्र या स्थानकांवर पिण्याच्या पाण्यासंदर्भात कोणतेही फलकही लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे अनेकदा प्रवाशांना पाणी कोठे आहे हे कळतच नसल्याचे चित्र आहे. उन्हाळा सुरू असल्याने आणि लांबहून प्रवास करणारे प्रवासी स्थानकांवर येत असल्याने त्यांना पाणीच मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे अनेकदा प्रवाशांना पैसे खर्च करून पाण्याच्या बाटल्या खरेदी कराव्या लागत आहेत. >
पाणी झाले महाग!
By admin | Published: March 22, 2016 1:59 AM