सुरेश लोखंडे,
ठाणे- उल्हास नदीतील पाणीसाठा प्रचंड घटल्याने आणि अद्याप पावसाचा पत्ता नसल्याने गेल्या आठवड्यापासून अनेक महापालिकांत पुन्हा पाणीबाणी निर्माण झाली आहे. आधीच तीन ते चार दिवस कपात असतानाही उरलेल्या दिवशी पाणीपुरवठा घटल्याने नागरिकांत तीव्र संताप आहे. त्याची दखल घेत आंध्र धरणातून शुक्रवारी संध्याकाळी जादा पाणी सोडण्यात आले. हे पाणी शनिवारी संध्याकाळपर्यंत शहाडला येणार असून कोरड्या पडलेल्या उल्हास नदीची पाणीपातळी वाढण्याची चिन्हे आहेत. किमान उपसण्याइतका हा साठा वाढल्यास पाणीपुरवठ्याचा प्रश्न काही अंशी मार्गी लागेल. नदीची जलपातळी घटल्याने मोहने, जांभूळ व टेमघर येथून पाणीपुरवठा होणाऱ्या शहरांना कमी दाबाने पाणीपुरवठा होतो आहे. पाऊस पडण्याचे लक्षण दिसत नसल्यामुळे या धरणातून सोडण्यात येणारे ७०० ते ८०० एमएलडी पाणी आणखी काही दिवस पुरवावे म्हणून केवळ ५०० एमएलडीवर आणले. त्याचा फटका पाणीपुरवठ्याला बसला. त्यामुळे अनेक विभागांत गोंधळ उडाला. ओरड सुरू झाली. त्याची दखल घेऊन पाटबंधारे विभागाने आंध्र धरणाच्या व्यवस्थापनाला पाणी सोडण्याची विनंती केल्याचे कार्यकारी अभियंता सुभाष वाघमारे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. बारवी धरणातून होणारा पाणीपुरवठाही कमी झाला आहे. धरणात पाणी आहे, पण ते पसरलेल्या स्वरूपात आहे. पाणी सोडणाऱ्या दरवाजांजवळ त्याची पातळी कमी आहे. >अद्याप पावसाचे लक्षण नाहीमागील वर्षी आजच्या दिवशी म्हणजे १० जूनला ढगांच्या गडगडाटात आणि विजेच्या कडकडाटासह ठाणे जिल्ह्यात ८५ मिमी पाऊस पडला होता. मात्र, यंदा १० तारीख उजाडल्यावरही पावसाचे लक्षण दिसत नसल्यामुळे पाणीपुरवठ्याच्या नियोजनाचा प्रश्न गंभीर बनला आहे. धरणातील पाणी दाबाने येत नसल्यामुळे शहरांना कमी पाणीपुरवठा होतो आहे. अशी स्थिती असली तरी बारवी व आंध्रा धरणात तीन आठवडे पुरेल एवढा पाणीसाठा आहे. आणखी काही दिवसांत पाऊस न आल्यास शेवटच्या या टप्प्यातील काही दिवस पाण्याची समस्या अधिक तीव्र होणार आहे.