- श्रीकिशन काळे पुणे : ‘जल है तो कल है’ या घोषवाक्याप्रमाणे आता विद्यार्थ्यांमध्ये पाण्याचे महत्त्व रुजावे, म्हणून येत्या २०२०-२१ या शैक्षणिक वर्षापासून नववी आणि दहावीसाठी जलसुरक्षा विषय अनिवार्य करण्याचा निर्णय झाला आहे. दहा भाषांमध्ये हा विषय शिकविला जाणार असून, जूनपूर्वी पुस्तके विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहेत.२०२०-२१ पासून शालेय शिक्षणात नववी-दहावीसाठी ‘जलसुरक्षा’ या विषयाचा अंतर्भाव केला आहे. या विषयाचा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी बालभारतीने एक तज्ज्ञांची समिती तयार केली असून, तिच्या कामाची सुरुवात नुकतीच पुण्यात झाली. या समितीमध्ये झीरो पेन्डसी राबविणारे माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, भूगर्भजलतज्ज्ञ सुरेश खानापूरकर, जलतज्ज्ञ उपेंद्र धोंडे, जलसंवाद चळवळ चालविणारे दत्ता देशकर यांच्यासह काही तज्ज्ञांचा सहभाग आहे.पुस्तक लिहिणाऱ्या समितीतील सदस्य उपेंद्र धोंडे म्हणाले, ‘पहिल्या बैठकीत पुस्तकात कोणते विषय, प्रकरण असणार यावर अंतिम निर्णय झाला. यासाठी दोन समित्या आहेत. एक सल्लागर समिती आणि दुसरी कोअर कमिटी आहे. सल्लागार समितीमध्ये जलतज्ज्ञ, जल चळवळीतील कार्यकर्ते, लेखक आदी २७-२८ जणांचा समावेश आहे. दुसºया समितीत प्रत्यक्ष लिहिणारे लेखक आहेत. अभ्यासक्रमात सोप्या पद्धतीने जलसुरक्षा विषय असणार आहे. या विषयाला गुण नसतील, तर ग्रेड असतील. जलचक्र, जलविज्ञान, जलप्रदूषण, जल गुणवत्ता आदी प्रकरणांचा समावेश आहे.’सध्या पाणी हा विषय खूप महत्त्वाचा आहे. नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना हा विषय अनिवार्य असेल. अभ्यासक्रमासाठी समिती नेमली आहे. जून, २०२०पासून पुस्तके उपलब्ध होतील. इतरांना तसेच या क्षेत्रातील व्यक्तींना ही पुस्तके संदर्भ म्हणून वापरता येतील.- राजीवकुमार पाटोळे, समन्वय अधिकारी, बालभारती
९-१०वीच्या विद्यार्थ्यांना जलसंवर्धनाचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 5:40 AM