नागपूर : राज्यातील दुष्काळ निसर्गाचा कोप असल्याचे चित्र निर्माण करून, राज्य सरकार लोकांना भ्रमित करीत आहे. पावसाने दगा दिला, म्हणून ही परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र हा सर्रास खोटारडेपणा आहे. राज्यातील जलसंकट हे ‘अस्मानी’ नव्हे ‘सुलतानी’ आहे. शासन आणि प्रशासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे आज ही स्थिती उद्भवली आहे, अशी टीका दुष्काळ निवारण व निर्मूलन मंडळाचे उपाध्यक्ष एच. एम. देसरडा यांनी येथे केली. दुष्काळ निवारण व निर्मूलन मंडळाच्या माध्यमातून राज्यातील दुष्काळग्रस्त २० जिल्ह्यांना भेटी देऊन तेथील परिस्थितीचा अभ्यास करण्यात आला आहे. त्यात मराठवाड्यातील आठ, विदर्भातील सात व नाशिक आणि पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. देसरडा हे चार दिवसांपासून विदर्भातील जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आले होते. शुक्रवारी रविभवन येथे त्यांनी पत्रकारांना दौऱ्याची माहिती दिली. ते म्हणाले, मागील तीन वर्षांत पाऊस कमी पडला, हे खरे आहे. मात्र त्याने दगा दिला नाही. त्यामुळे पावसामुळे आजच्या पाणी टंचाईची भीषण समस्या निर्माण झाली, असे म्हणणे संयुक्तिक ठरणार नाही. पाऊस कमी जास्त पडतच असतो. हा निसर्गचक्राचा एक भाग आहे. मागील वर्षी मराठवाड्यात ४० टक्के व विदर्भात केवळ २० टक्के कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे या दुष्काळाचे संपूर्ण खापर पावसाच्या डोक्यावर फोडणे पूर्णत: चुकीचे आहे. विदर्भ हा दुष्काळग्रस्त प्रदेश होऊच शकत नाही, येथील शेतात प्रत्येक पावसाळ््यात एक कोटी लीटर प्रति हेक्टर पाऊस पडतो. मग आजची परिस्थिती का निर्माण झाली, याचा सर्वांनी विचार करण्याची गरज आहे. ४ फेब्रुवारीपासून राज्यातील २० जिल्ह्यांतील गावांना भेटी देऊन, गावकरी, प्रशासन व तज्ज्ञांशी संवाद साधला आहे. त्यातून ही वस्तुस्थिती पुढे आल्याचे देसरडा यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
जलसंकट ‘अस्मानी’ नव्हे, सुलतानी!
By admin | Published: April 30, 2016 4:58 AM