मुंबई : संपूर्ण राज्यासाठी औरंगाबाद येथे मृद व जलसंधारण आयुक्तालयाची स्थापना करण्यात येणार असून जलसंधारण विभागाचे नाव बदलून ते आता मृद व जलसंधारण विभाग असे करण्यात आले आहे. राज्य मंत्रिमंडळाने आज झालेल्या बैठकीत त्यास मान्यता दिली. औरंगाबाद येथील वाल्मी संस्थेच्या परिसरात हे आयुक्तालय येत्या १ मे पासून सुरु होणार आहे.गेल्या आॅक्टोबर मध्ये औरंगाबाद येथे झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीत औरंगाबाद येथे जलसंधारण आयुक्तालय स्थापन करण्यास तत्त्वत: मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार मृद व जलसंधारण आयुक्तालयाच्या स्थापनेसह जलसंधारण विभागाच्या क्षेत्रीय यंत्रणेची फेररचना करण्याची कार्यवाही करण्यात आली. मृद व जलसंधारण आयुक्तालयाच्या आयुक्त पदावर भारतीय प्रशासन सेवेतील (अधिकालिक वेतनश्रेणीत) अधिकारी नेमण्यात येणार आहे. जल व भू-व्यवस्थापन ( वाल्मी ) ही जलसंपदा विभागाच्या अखत्यारीतील प्रशिक्षण संस्था तिच्या स्वायत्ततेला बाधा न आणता मृद व जलसंधारण विभागाकडे वर्ग करुन या विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली आणण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. सध्या सरळसेवा पदभरतीसाठी घालण्यात आलेली बंदी मृद व जलसंधारण विभागास लागू ठरणार नाही. तसेच, मृद व जलसंधारण विभागाचे स्वतंत्र सेवाप्रवेश नियम प्रसिद्ध होईपर्यंत आकृतिबंधामध्ये मंजूर असलेल्या सर्व पदांसाठी जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, कृषी इत्यादी विभागातील समकक्ष पदांचे सेवाप्रवेश नियम लागू ठरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (विशेष प्रतिनिधी)
औरंगाबाद येथे जलसंधारण आयुक्तालय
By admin | Published: April 26, 2017 1:49 AM