लोणावळा : टाटांच्या सहा धरणांमधील पाणी दुष्काळग्रस्त भागाला द्यावे, या मागणीसाठी जलअभ्यासक प्रफुल्ल कदम यांच्या नेतृत्वाखाली मराठवाडा, सोलापूर, सांगोला, लोणावळा येथील नागरिकांनी वलवण धरणाच्या जलाशयात उतरून जलसत्याग्रह केला. यावेळी पत्रकारांना टाटा धरणापर्यंत जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. आंदोलकांपैकी केवळ १० जणांना धरणावर जल सत्याग्रहासाठी सोडले. तेदेखील त्यांच्याकडील मोबाइल व कॅमेरे काढून घेण्यात आले होते. धरणात किती पाणीसाठा शिल्लक आहे, याची माहिती सर्वांना मिळू नये याकरिता ही दक्षता घेतल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. टाटाचे मावळ व मुळशी परिसरातील वलवण, लोणावळा, शिरवता, सोमवडी, ठोकळवाडी व मुळशी या सहा धरणांमध्ये तब्बल ४८.९७ टी.एम.सी. एवढा पाणासाठा शिल्लक ठेवला आहे. हे पाणी भीमा खोऱ्यात वाहणाऱ्या पश्चिमवाहिनी नद्यांचे अडविलेले आहे. ते आमच्या हक्काचे असून, तातडीने दुष्काळग्रस्त नागरिकांना द्यावे. तसेच इंद्रायणी पात्रात पाणी सोडावे, अशी मागणी आंदोलकांनी केली. टाटाचा हा जलव्यवहार राज्यघटनेच्या कलम ३८ व ३९च्या विरोधात, तसेच जलनीती, जलसंपत्ती प्राधिकरण कायदा व जलविद्युत कायद्याविरोधात असल्याचे सांगत आंदोलकांनी टाटाच्या अधिकाऱ्यांना संविधानाची प्रत भेट दिली. (वार्ताहर)
टाटा धरणांतील पाण्यासाठी जलसत्याग्रह
By admin | Published: May 08, 2016 2:13 AM