राज्याच्या अनेक भागांतील जनता भीषण दुष्काळाने होरपळत असताना उपलब्ध पाणी सर्वप्रथम पिण्यासाठी वापरणे आवश्यक असूनही क्रिकेटचे सामने व मद्यनिर्मिती अशा चैनीसाठी लाखो लीटर पाण्याचा अपव्यय होत आहे. नेमका हाच मुद्दा पकडून उच्च न्यायालयाने ‘माणसे महत्त्वाची की क्रिकेट सामने?‘ असा संतप्त सवाल बुधवारी मुंबईत केला. तर दुसरीकडे तहानलेल्या मराठवाड्यासाठी जायकवाडीत आणल्या जाणाऱ्या पाण्यापैकी बहुतांश पाणी बीअर आणि मद्यनिर्मिती कारखान्यांना पुरविले जात असल्याचे चित्र आहे.माणसे महत्त्वाची की क्रिकेट?; कोर्टाने झापलेमुंबई :भीषण दुष्काळ आणि तीव्र पाणीटंचाईने महाराष्ट्राच्या अनेक भागांतील जनता होरपळत असताना ‘आयपीएल’ क्रिकेट सामन्यांच्या खेळपट्ट्या तयार करण्यासाठी लाखो लीटर पाणी वापरणे हा पाण्याचा ‘गुन्हेगारी अपव्यय’ आहे, असे तिखट बोल उच्च न्यायालयाने क्रिकेट संघटनांना बुधवारी सुनावले. तसेच तुमच्यासाठी माणसे महत्त्वाची की क्रिकेट सामने महत्त्वाचे, असा सवालही न्यायालयाने केला.राज्यात पाण्याची परिस्थिती एवढी गंभीर असताना हे सामने जेथे पाणी मुबलक आहे अशा अन्य ठिकाणी घेणे अधिक योग्य होईल, अशी सूचनाही न्यायालयाने केली. कार्यकारी अॅडव्होकेट जनरल रोहित देव यांनी उद्या गुरुवारी हजर राहून राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश न्यायालयाने दिले. तसेच ‘आयपीएल’ सामन्यांच्या बाबतीत काय अंतरिम आदेश देता येईल हेही गुरुवारीच पाहू, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
> टंचाईच्या पाण्यात दारूचा महापूरसंजय देशपांडे, औरंगाबाददुष्काळाने होरपळत असलेल्या मराठवाड्यातील जनता पाण्यासाठी वणवण भटकत असताना टंचाईच्या पाण्यातून दारू गाळली जात असल्याचे चित्र आहे. औरंगाबादेतील बीअर व मद्यनिर्मिती करणाऱ्या उद्योगांना अवघ्या १६ रुपयांत एक हजार लीटर शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जात असून १२ उद्योग मद्यनिर्मितीसाठी दररोज ४० लाख लीटर पाण्याचा वापर करत आहेत.जायकवाडी धरणातून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) दररोज ५६ दशलक्ष लीटर पाण्याचा उपसा करते. गेल्या वर्षी जून महिन्यात उद्योगांसाठी दहा टक्के पाणीकपात करण्यात आली. कपातीपूर्वी दररोज ६३ दशलक्ष लीटर पाण्याचा उपसा केला जात होता. सध्या उपसा होत असलेल्या ५६ पैकी ३२ दशलक्ष लीटर पाणी उद्योगांना दिले जाते. उर्वरित २४ दशलक्ष लीटर पाण्यातून वाळूज, रांजणगाव, घाणेगाव, वळदगाव, कुंभेफळ आदी १३ गावांची तहान भागविली जाते. उद्योगांसाठी १६ ते १९ रुपयांत, तर घरगुती वापरासाठी ६ रुपयांत एक हजार लीटर पाणी उपलब्ध केले जाते. उद्योगांसाठी दिल्या जाणाऱ्या ३२ दशलक्ष लीटर पाण्यापैकी ४ ते ५ दशलक्ष लीटर पाण्याचा पुरवठा बीअर व मद्यनिर्मिती करणाऱ्या कारखान्यांना केला जातो. औरंगाबादेत असे १२ कारखाने आहेत. बीअरनिर्मिती करणाऱ्या सहा, देशी दारूनिर्मिती करणाऱ्या दोन, तर विदेशी दारूनिर्मिती करणाऱ्या चार कारखान्यांचा यात समावेश आहे.आॅस्ट्रेलियाच्या एका नामांकित बीअर कंपनीने भारतात उद्योग सुरूकरण्यापूर्वी जायकवाडीच्या पाण्यावर संशोधन केले होते. हे पाणी सिलिकामुक्त आणि शुद्ध असल्याचे तसेच त्यात ‘फरमेन्टेशन’ची प्रक्रिया प्रभावी होते, असे या संशोधनात आढळले होते. त्यानंतर बीअरनिर्मिती उद्योग औरंगाबादलाच पसंती देऊ लागले. अशा प्रकारे देशाची ‘बीअर राजधानी’ अशी ओळख औरंगाबादची बनली आहे.—————हे आहेत मद्य, बीअरनिर्मिती उद्योगवाळूज औद्योगिक वसाहतीतील मिलेनियम बीअर इंडिया लि., फोस्टर इंडिया लि., कार्ल्सबर्ग इंडिया प्रा.लि., लीलासन्स इंडस्ट्रीज, औरंगाबाद ब्रेवरिज आणि स्कोल ब्रेवरिज हे पाच कारखाने बीअरनिर्मिती करतात. चिकलठाण्यातील युनायटेड स्पिरिट, रॅडिको एनव्ही डिस्टिलरीज, कोकण अॅग्रो आणि बीडीए लि. हे कारखाने विदेशी मद्य, तर रॅडिको आणि डेक्कन बॉटलिंग हे कारखाने देशी मद्याची निर्मिती करतात. इंडो-जर्मन ब्रेवरिज या उद्योगाकडून शीतपेयांची निर्मिती केली जाते. तेथेही पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो.—————लातूरचे दोन दिवसांचे पाणी...मद्यनिर्मितीसाठी दररोज ४० लाख लिटर पाण्याचा वापर करण्यात येतो. भीषण पाणीटंचाईशी सामना करणाऱ्या लातूर शहराची दररोजची गरज २० लाख लिटर पाण्याची आहे. लातूर शहराची दोन दिवसांची तहान भागवणाऱ्या पाण्याची बीअर व मद्यनिर्मिती उद्योगांकडून एकाच दिवसात नासाडी केली जाते, हे विशेष.