पिंपरी : पवना धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत असल्याने पिंपरी-चिंचवडवरील पाणीकपातीचे संकट टळणार आहे. पंधरा दिवसांत आढावा घेऊन पाणीकपात मागे घेण्याविषयी निर्णय होणार असल्याचे जलसंपदा आणि महापालिकेच्या विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. याबाबत महापालिका अधिकारी आणि जलसंपदा विभागाचे अधिकारी यांच्यात आढावा बैठक होणार आहे. पिंपरी-चिंचवड शहराला पवना धरणातून पाणीपुरवठा होतो. पवना धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने सुरुवातीला दिवसातून एकदा, त्यानंतर दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. जूनअखेरपर्यंत पावसाने ओढ दिल्याने पिंपरी-चिंचवडकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता वाढली होती. मात्र, जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून मावळ परिसरात संततधार सुरू झाली. त्यामुळे पाणीपुरवठ्यात वाढ होण्यास सुरुवात झाली. १० टक्क्यांवर पोहोचलेल्या पाणीसाठ्यात दोन टक्क्यांनी वाढ झाली. त्यानंतर सलगपणे संततधार सुरू होती. सर्वत्र नदी-नाल्यांना पाणी आल्याने पवना धरणातून पवना नदीत सोडले जाणारे पाणी बंदही केले होते. मावळात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे आजअखेर धरणाचा साठा ५४.३४ टक्के झाला आहे. एक जूनपासून धरणक्षेत्रात १०७४ मिमी पावसाची नोंद झाली आहे, तर २४ तासांत धरणक्षेत्रात १८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या २० दिवसांत ४४.३४ टक्क्यांनी पाणीसाठा वाढला आहे. चोवीस तासांत ०.७७ टक्क्यांनी पाणीसाठा वाढला आहे. (प्रतिनिधी)गेल्या वर्षी आॅगस्टअखेर ८० टक्के पाणीसाठागेल्या पावसाचे प्रमाण कमी होते. आॅगस्टअखेर धरणात पाणीसाठा ८० टक्के होता. गेल्या वर्षीच्या जुलै महिन्याच्या तुलनेत पाणीसाठा अधिक आहे. मावळात संततधार सुरूच असल्याने पाणीसाठ्यात वाढ होणार आहे, असा अंदाज जलसंपदा विभागाने वर्तविला आहे.
पाणीकपातीचे संकट टळणार
By admin | Published: July 22, 2016 1:29 AM