पुणे : खडकवासला धरण 99 टक्के भरल्या गेल्या दोन दिवसांपासून धरणातून मुठा नदीत सुरू असलेला पाण्याचा विसर्ग गुरूवारी पहाटे बंद करण़्यात आला. दरम्यान, खडकवासला धरणसाखळी मधील चारही धरणांच्या पाणीसाठा साडे चौदा टीएमसीवर पोहचला आहे. तर धरणसाखळी मधील सर्वाधिक पाणी क्षमता असलेली पानशेत आणि वरसगाव ही धरणे अनुक्रमे 52 आणि 42 टक्के भरण्याच्या मार्गावर आहेत.तर या धरणसाखळी मधील खडकवासला वगळता पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात तुरळक स्वरूपाचा पाऊस सुरूच असल्याने पाणीसाठयात चांगली वाढ होत असल्याचे पाटबंधारे विभागाच्या अधिका-यांकडून सांगण्यात आले. खडकवासला धरण मंगळवारी (दि.12) सकाळी 98 टक्के भरल्याने धरणातून मुठा नदीत दोन हजार क्यूसेक पाणी सोडण्यास सुरूवात करण्यात आली होती. मात्र, धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने हा विसर्ग वाढवून मंगळवारी रात्री दहा हजार क्यूसेक करण्यात आला. दरम्यान, बुधवारी पावसाचा जोर ओसरल्याने हा विसर्ग 2 हजार क्यूसेकवर आणण़्यात आला होता. मात्र, खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पूर्णच थांबल्याने गुरूवारी सकाळी आठ वाजता हा विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले.पावसाची विश्रांती या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात आज पावसाने पूर्ण पणे विश्रांती घेतली. खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 1 मिमी, वरसगाव 5 मिमी, पानशेत 6 मिमी तर टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 8 मिमी पाऊस झाला आहे. दरम्यान गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने या धरणसाखळीमधील पानशेत धरण 52 टक्के भरले असून वरसगाव धरण 44 टक्के भरले आहे. तर टेमघर धरणाचा पाणीसाठा 35 टक्क्यांवर पोहचला आहे.
खडकवासल्यातील पाणी विसर्ग बंद
By admin | Published: July 14, 2016 6:30 PM