लातूर : डोंगरगाव उच्चपातळी बंधारा तसेच भंडारवाडी, माकणी प्रकल्पातून टँकरद्वारे पाणी भरलेले शहरातील नऊही जलकुंभ पुन्हा कोरडेठाक पडले आहेत़ पाणी वितरण करण्यासाठी जबाबदार अधिकारी जलकुंभावर नियुक्त नसल्याने नियोजन बिघडले आहे.शहरातील गांधी चौक, विवेकानंद चौक, अशोक हॉटेल चौक, बार्शी रोड, औसा रोड, डालडा फॅक्टरी, रेणापूर नाका आदी ठिकाणी मोठ्या क्षमतेचे ९ जलकुंभ आहेत़ त्यात पाच-सहा दिवसांपूर्वी जवळपास एक कोटी लिटर्स पाणी संकलित केले होते़ भंडारवाडी, डोंगरगाव, माकणी येथील प्रकल्पातून मोठ्या टँकरद्वारे पाणी आणून हा साठा करण्यात आला होता़ दोन दिवसांपासून शहरातील काही प्रभागांत छोट्या टँकरद्वारे पाणी वितरण करण्यात आले़ त्यामुळे जलकुंभ कोरडेठाक पडले आहेत़ किमान १५ दिवसांचा साठा करून पाणी वितरण करावे, अशी काही नगरसेवकांची मागणी होती़ परंतु त्याकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष करून उपलब्ध झालेल्या पाण्याचे वितरण केले़ त्यामुळे बुधवारी सकाळीच शहरातील नऊही जलकुंभ कोरडेठाक पडले. पाणी दोन दिवसही पुरले नाही़ शिवाय हे पाणी पूर्ण शहरालाही मिळू शकले नाही़ शहरातील गंजगोलाई पूर्व भागातील नागरिक स्वत: जलकुंभावर येऊन पाणी नेत होते़ परंतु आता जलकुंभातच पाणी नसल्यामुळे लातुरकरांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे़ (प्रतिनिधी)
लातुरातील जलकुंभ पुन्हा कोरडेठाक!
By admin | Published: March 17, 2016 1:50 AM