पंढरपूर : उजनी पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरु असल्याने उजनीची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. उजनी व वीर धरणातील पाणी भीमा नदीपात्रात सोडल्याने चंद्रभागा नदी दुथडी भरुन वाहत आहे. चंद्रभागा नदीपात्रातील पाणी धोकादायक पातळीजवळ पोहोचत असल्याने नदीकाठच्या १०० घरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले असल्याची माहिती नगराध्यक्षा साधना भोसले यांनी दिली. पाण्याचा प्रवाह वाढल्याने भीमा नदीत पाणी वाढल्याने पंढरपुरातील व्यास नारायण झोपडपट्टीत पाणी शिरले आहे. येथील नागरिकांना ६५ एकर परिसरातील यात्री निवासस्थानी स्थंलातर करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली.
पंढरपुरातील पूर परिस्थिती निर्माण होण्याच्या पातळीपर्यंत पाणी पोहचल्यामुळे चंद्रभागेच्या नदीकाठी प्रथम ज्या भागामध्ये पाणी शिरते. अशा व्यासनारायण झोपडपट्टी व आंबेडकर नगर येथील नागरिकांना स्थलांतरीत होण्याबाबत नगरपरिषद प्रशासनाने सूचना केली होती.
सोमवारी पहाटे साडेसहा वाजण्याच्या सुमारास वीर धरणातून नीरा नदीमध्ये ९४,२५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हा विसर्ग सकाळी ८ वाजता १ लाख करण्यात आला आहे. वीर धरणामध्ये येणाºया विसर्गात वाढ होत आहे. हा विसर्ग वाढवून १ लाख ५ हजार ते १ लाख १० हजार करण्यात येणार आहे.
नीरेतून १ लाख १० हजार क्युसेक व उजनी धरणातून ७० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. यामुळे चंद्रभागा नदीपात्रातील पाण्याचा एकूण विसर्ग १ लाख ९० हजारांच्या आसपास राहणार आहे.
सेल्फी काढण्यासाठी नागरिकांची गर्दी- चंद्रभागा नदीपात्रातील पाणी पातळी वाढल्याने पुंडलिक मंदिराला पाण्याचा वेढा पडला आहे. तसेच पुंडलिक मंदिराजवळील छोटी मंदिरेदेखील पाण्याखाली गेली आहेत. हे नयनरम्य चित्र पाहण्यासाठी व सेल्फी घेण्यासाठी शहरातील नागरिकांसह आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी नव्या पुलावर गर्दी केली होती.
जुन्या दगडी पुलासह बंधारा पाण्याखाली- उजनी धरण व नीरा नदीतून भीमा नदीपात्रात पाणी सोडल्यामुळे पंढरपुरातील अंबाबाई पटांगणाजवळील चंद्रभागा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा व जुना दगडी पूल पाण्याखाली गेला आहे.
एवढ्या पाणी पातळीनंतर हा भाग जातो पाण्याखाली
- - जुना दगडी पूल - ४३९.२०० मीटर पाणी पातळी (४० हजारांचा क्युसेक)
- - गोपाळपूर जुना पूल - ४४३.४०० मीटर (१ लाख २२ हजार क्युसेक)
- - गोपाळपूर नवा पूल - ४४६.६०० मीटर (१ लाख ६४ हजार क्युसेक)
- - पंढरपूर नवा पूल (अहिल्या पुल) - ४४७.२०० मीटर (२ लाख ७९ हजार क्युसेक)
- - पंढरपूर इशारा पातळी - ४४३ मीटर (१ लाख १६ हजार क्युसेक)
- - पंढरपूर धोका पातळी - ४४५.४०० (१ लाख ८७ हजार क्युसेक)