ऑनलाइन लोकमत -
सांगली, दि. ११ - लातूरला पाणीपुरवठा करण्यासाठी पाण्याची रेल्वे अखेर मिरजेतून रवाना झाली आहे. पाणीपुरवठा करण्यासाठी रेल्वे टँकर रविवारी मिरजेत पोहोचले होते. रेल्वेस्थानकातील यंत्रणेमार्फत हे टँकर भरण्यात आल्यानंतर रेल्वे रवाना झाली आहे. प्रत्येक टँकरमध्ये 50 हजार लीटर पाणीसाठा आहे. 10 टँकर भरल्यानंतर रेल्वे लातूरच्या दिशेने रवाना करण्यात आली असून उर्वरित टँकर भरण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे.
राजस्थानच्या कोटा येथून ५० टँकर रविवारी सकाळी मिरजेत आले होते. टँकर भरण्यासाठी रेल्वे पाणीपुरवठा केंद्रापासून रेल्वे यार्डापर्यंत पाईपलाईनचे काम पूर्ण होण्यासाठी चार दिवस लागणार असल्याने रेल्वेस्थानकातील पाणी भरण्याच्या यंत्रणेद्वारे दुपारी दहा टँकर भरण्यास सुरुवात करण्यात आली होती. मात्र, पाणी भरण्याची गती अत्यंत कमी असल्याने रात्रीपर्यंत दहा टँकर भरले नव्हते. किमान दहा टँकरमध्ये पाणी भरून सोमवारी ते लातूरला पाठविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते. त्याप्रमाणे 10 टँकर भरल्यानंतर रेल्वे सोमवारी रवाना करण्यात आली आहे.