नाशिक : खुल्या बाजारात कांद्याने पन्नाशी गाठली असून, पेट्रोलचे दरही ऐंशी रुपये लिटरपर्यंत पोहोचल्याने ऐन विधानसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात प्रचारासाठी वाढत्या महागाईचा आयता मुद्दा विरोधी पक्षांना मिळाला आहे. कांद्याला चांगला दर मिळू लागल्यामुळे शेतकºयांचे समर्थन केले तर कांदा खाणारे ग्राहक नाराज आणि ग्राहकांच्या बाजूने दरवाढीबद्दल चिंता व्यक्त केली, तर शेतकºयांचा रोष ओढवून घेण्याची भीती सत्ताधाºयांना भेडसावू लागली आहे. त्यामुळे देशपातळीवर कांद्याच्या चढ्या भावाबद्दल नाराजी व्यक्त केली जात असताना सत्ताधाºयांनी आपल्याच ताब्यातील दोन राज्यांच्या निवडणुकांमुळे शांत राहण्याची भूमिका घेतली आहे.सप्टेंबरनंतर बाजारपेठेत दरवर्षी कांद्याची मागणी वाढत असल्याने पाहिजे त्या प्रमाणात खरिपाच्या कांद्याची आवक होऊ शकलेली नाही. परिणामी भाव वाढले. नाशिक जिल्ह्यातच कांद्याने गेल्या आठवड्यात क्विंटलला पाच हजारांचा टप्पा ओलांडल्यामुळे खुल्या बाजारात कांदा ७० रुपयांपर्यंत विक्री होऊ लागला. केंद्रीय समितीने प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली व कांद्याचे दर वाढविण्याच्या कारणांची मीमांसा केली. मात्र या समितीलाच कांदा उत्पादक शेतकºयांच्या रोषाला सामोरे जावे लागल्याच्याही घटना घडल्या आहेत. त्यामुळे दर कमी करण्याचा प्रयत्न केल्यास सरकारला शेतकºयांचा रोष पत्करावा लागेल.
कांदा दरवाढीने सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यांत पाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 2:15 AM