पाण्यासाठी म्हणजे धरणासाठी घरदार गेले आणि आता सरकारने जिथे आणून टाकले आहे, तिथे पाणी शोधण्यासाठी आमचा जीव जाण्याची वेळ येईल की काय अशी स्थिती आहे. इतके पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्याचे प्रकल्पग्रस्तांनी सांगितले. नव्या गावांत जाणारे रस्ते खाचखळग्यांचे, मातीचे आहेत. तेथे पोचणेही प्रचंड त्रासाचे असल्याचे तेथे प्रत्यक्ष भेट दिल्यावर लक्षात आले.नोकऱ्यांचे ठरावही वांझोटेठाणे जिल्ह्यासाठी हे धरण महत्वाचे असले, तरी या धरणाच्या वाढीव पाण्यासाठी एमआयडीसीलाही मोठी कसरत करण्याची वेळ आली आहे. धरणग्रस्तांना आर्थिक मोबदला देण्यासोबत त्यांना नोकरी देऊन हा प्रश्न सोडवण्याचे धोरण आखण्यात आले आहे. नोकरीचा प्रश्न सुटत नसल्याने धरणग्रस्तांनी गाव न सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पुढे नोकरी मिळाल्यावर नोकरीच्या ठिकाणाचा विचार करता त्यानंतरही गाव सोडणे अवघड जाईल, असे ग्रामस्थांचे सांगणे आहे. या गावांसाठी सासणे गाव, म्हसा, तागवाडी, काचेकोली, चिमण्याची वाडी, फणसोली, वेहेरे आणि मुरबाड गावच्या हद्दीत पुनर्वसन करण्यासाठी सुविधा पुरविण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी निविदाही काढण्यात आल्या. रस्ते, शाळा, पाणी, समाजमंदिर, अंगणवाडी, स्मशानभूमी आणि आरोग्य केंद्रांची कामेही सुरु आहेत. मात्र ती कामे निकृष्ट असल्याने तेथे जाणार कसे, राहणार कसे असा प्रश्न प्रकल्पग्रस्त करत आहेत. धरणग्रस्तांंचे गाव ज्याज्या ठिकाणी वसविण्यात येणार आहे, तेथे नागरी सुविधा पुरविण्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे तेथे घर बांधायचे कसे आणि राहायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे. धरणपात्रात असलेल्या तोंडली, मोहघर व संलग्न पाडे, काचकोली व संलग्न पाडे, कोळेवडखळ, सुकाळवाडी आणि मानिवली या गावांनी त्यांना ठरवून दिलेल्या जागी अद्याप पुनर्वसन करुन घेतलेले नाही. काचकोलीचे दुसरे गावठाण खडकाळ रस्त्यामुळे अडचणीचे इतर ग्रामस्थांसाठी याच परिसरात काचकोली गावठान एक उभारण्यात आले आहे. तेथे पोचण्याचा रस्ता अडचणीचा आहे. दोन किमीचा रस्ता खडकाळ असल्याने आणि काही ठिकाणी तो मातीचा असल्याने पावसाळ्यात त्याचा वापर करणे अशक्य आहे. नव्या गावठाणापर्यंत पोहचण्याची दुसरी कोणतीच सोय नसल्याने अनेक ग्रामस्थ तेथे जाण्यास तयार नाहीत. तेथे नागरी सुविधा नावापुरत्या, कामचलाऊ आहेत. येथे बांधण्यात आलेली शाळा पाहिल्याच पावसात गळण्यास सुरुवात झाली आहे. सार्वजनिक शौचालये फक्त दाखवण्यापुरती उभारली आहेत. अंतर्गत रस्त्यांची अवस्था बिकट आहे. त्यातच येथील जागेचे सपाटीकरण न झाल्याने ग्रामस्थांनी घरे बांधायची कशी, अशा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सुविधाच नसल्याने येथे ग्रामस्थ राहण्यास तयार नाहीत. याच बारवी धरणाच्या पात्रात जाणारे महत्वाचे आणि मोठे गांव म्हणजे काचकोली. या गावाची लोकसंख्या एक हजाराच्या वर आहे. त्यात ६० टक्के नागरिक हे आदिवासी आहेत, तर उर्वरित कुटुंबे ही कुणबी समाजाची आहेत. हे गाव पूर्ण पाण्याखाली येणार असल्याने आदिवासींना सुरक्षितस्थळी वसविण्यासाठी काचकोळी येथील डोंगराच्या वरच्या पट्ट्यात सोय करण्यात आली आहे. काचकोळी गावठाण दोन आदिवासींसाठी आहे.हे एकमेव ठिकाण असे आहे की तेथे एमआयडीसीने योग्य प्रमाणात सुविधा पुरविल्या आहेत. शाळा, स्मशानभूमी, रस्ते, वीज आणि पाण्याची तात्पुरती सोय आहे. तरी एकही आदिवासी तेथे अद्याप वास्तव्यास आलेला नाही. तुलनेने बऱ्या सुविधा असूनही आदिवासी आपले घर सोडून येण्यास तयार नाहीत. गाव सोडल्यावर आपल्याला नोकरी मिळणार नाही या भीतीने ते गावातच वास्तव्यास आहेत. >म्हसाजवळच्या घरांचीही विदारक स्थिती याच मोहघरमधील इतर कुटुबियांना म्हसा गावाजवळ पुनर्वसनासाठी जागा उपलब्ध करुन दिली आहे. मात्र तेथे पोलीस पाटील रामचंद्र भोईर यांच्या व्यतिरिक्त कोणताही ग्रामस्थ स्थलांतरीत झालेला नाही. केवळ रस्ते करुन गाव तसेच सोडण्यात आले आहे. पाण्याची, स्मशानाची, शाळेची आणि इतर कोणतीच नागरी सुविधा येथे उपलब्ध नाही. >मोहघरचा पाण्यासाठी संघर्षमोहघर हे गांव धरणात येणार असल्याने तेथील कुटुंबांचे पुनर्वसन हे मोहघरच्या वरच्या रस्त्यावर आणि तागवाडी या ठिकाणी करण्यात येणार आहे. तेथे एमआयडीसीने १४ एकर जागेत काही सुविधा पुरवित कुटुंबांना घरे बांधण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिली आहे. ३६ कुटुंबासाठी ही जागा निश्चित करण्यात आली होती. त्यातील १६ कुटुंबेच तेथे राहण्यासाठी गेली आहेत. तेथे वीज आणि रस्त्याची सोय करण्यात आली आहे. ज्या पाण्यासाठी हे गाव हटविण्यात आले, त्या गावाला पाणी मात्र अजून दिलेले नाही. ज्या पाण्यासाठी घरदार गेले त्या पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ कुटुंबांवर आली आहे. १६ कुटुंबे येथे राहण्यास आलेली असली तरी त्यांना अद्याप योग्य मोबदल्याची पूर्ण रक्कम आणि नोकरी मिळालेली नाही. एमआयडीसीच्या विश्वासावर आम्ही गाव सोडले. त्यांनी नोकरीची हमी द्यावी आणि गावात पाण्याची सोय करून द्यावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ मंगल भोईर यांनी केली आहे. >पाण्याची सोयच नाहीकाचकोळीबाबत स्थानिक ग्रामस्थ मोतीराम कडव यांना विचारले असता गावठाण एकसाठी २२ एकर जागा देण्यात आल्याचे ते म्हणाले. मात्र या जागेपर्यंत पोचण्याचा रस्ता हा अद्याप तयार केलेला नाही. त्यामुळे ग्रामस्थ तेथे राहण्यास जात नाहीत. या ठिकाणी ७८ कुटुंबांचे पुनर्वसन केले जाणार आहे. मात्र त्यांच्यासाठी पाण्याची कोणतीच सोय नाही. १० ते १२ कुटुंबे या ठिकाणी राहण्यास आली आहेत. पण त्यांची पाण्याविना वणवण सुरू आहे. धरण उराशी असतांनाही त्यांना पाणी मिळत नसल्याने ग्रामस्थ नाराजी व्यक्त करत आहेत. पाण्यासाठी बोअरवेल खोदण्यात आली. पण तिला अद्याप पंप बसविलेला नाही. सांडपाणी वाहून जाण्याची कोणतीच व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे पुनर्वसनासाठीची जागा ही राहण्यायोग्य नसल्याने ग्रामस्थ एमआयडीसीबाबत नाराजी व्यक्त करीत आहेत.
पाण्यासाठी घरे गेली, आता पाण्यासाठीच जीव जातोय
By admin | Published: April 03, 2017 4:26 AM