ठाणे - महाराष्ट्रभरात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. ठाण्यात नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे. ठाण्यातील नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नसेल तर ठाणे शहर बंद पाडू असा इशारा त्यांनी दिला आहे.
वीस वर्षांपासून धरण बांधण्याची मागणी होत असताना, धरण का बांधले जात नाही. महानगरपालिका आयुक्त संजीव जैस्वाल यांनी पाण्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करू नयेत व ठाणे शहरात पाण्याची आणीबाणी लागू करावी अशी मागणी आव्हाड यांनी केली आहे. पाण्याचा प्रश्न महत्वाचा समजला नाही तर, आम्हाला ठाणे शहर बंद पाडावे लागेल असा इशारा आव्हाड यांनी दिला.
सगळ्यात उच्चभ्रू वस्ती म्हणून घोडबंदरला समजले जाते. मात्र त्याच घोडबंदरला ३६५ दिवस पाणी मिळत नाही. एवढच नाही तर संपूर्ण ठाणे शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तरीही ठाण्यातील लोकप्रतिनिधी एवढे शांत का झाले आहेत. मी एकटाच पाण्यासाठी आवाज उठवत आहे. पक्ष कोणतेही असो आमदारांनी पाण्याच्या प्रश्नासाठी पुढाकर घ्यायला हवे ,असे आव्हाड म्हणाले.
लोकप्रतिनिधी शांत का बसली आहेत, जनता आता असा प्रश्न विचारू लागली आहेत. घोडबंदरमधून आज आवाज उठला आहे. आता तो संपूर्ण ठाण्यात घुमणार आहे. ठाण्यात आज घडीला पाणीच नाही. ठाण्यात निर्माण झालेल्या या परिस्थितीला फक्त सेना-भाजप जवाबदार असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे.