ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ११ - मुंबईची पाण्याची वाढती गरज भागवण्यासाठी कोयनेचे वाया जाणारे ६७ टीएमसी (१टीएमसी =१अब्ज) पाणी बंद पाइपलाइनद्वारे आणण्याचा प्रस्ताव केंद्रीय नदीजोड प्रकल्पविषयक समितीसमोर ठेवण्यात आला असल्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सांगीतले आहे. वीजनिर्मितीनंतर धरणातील सुमारे ६७ टीएमसी पाणी वशिष्ठ नदीत सोडले जाते. ते शेवटी समुद्रात जाऊन मिळते. या प्रस्तावाच्या अंमलबजावणीसाठी २२७५ कोटी येवढा अवाढव्य खर्च आहे. आणि येवढा खर्च पेलण्याची राज्य सरकारची आर्थिक ताकद नाही मात्र, केंद्र सरकारच्या मदतीने हा प्रकल्प पुर्ण होऊ शकतो.
मुंबईचं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्व लक्षात घेऊन तो राष्ट्रीय प्रकल्प म्हणून जाहीर करावा आणि केंद्र सरकारने त्यासाठी मदत करावी अशी राज्य सरकारची मागणी आहे.
केंद्रात व राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आंतरराज्य पाणीवाटप आणि प्रस्तावित नदीजोड प्रकल्पांचा नव्याने आढावा घेण्यात येत आहे. केंद्रीय जलसंपदामंत्री उमा भारती अध्यक्ष असलेल्या समितीसमोर राज्यातील अनेक नदीजोड प्रस्ताव नव्याने चर्चेसाठी ठेवण्यात आले आहेत.
कोयना धरणातील वाया जाणारे हे पाणी चिपळूण ते मुंबई असे साधारणत १२५ ते १३० किलोमीटर अंतर बंद पाइपलाइनमधून आणण्याचा प्रयत्न आहे.