अमरावती - पूर्व व पश्र्चिम विदर्भातील जलाशयाची स्थिती गंभीर असून, जानेवारी महिन्यात काही जलाशयांतील पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे यंदा उन्हाळ्यात वन्यप्राणी, पक्षांसमोर भीषण जलसंकट उभे राहणार असल्याचे संकेत आतापासून मिळू लागले आहे.
यावर्षी पाऊस अत्यल्प कोसळल्याने जमिनीत पाण्याची पातळी फारच कमी आहे. मात्र, जलाशयांतदेखील पाणीसंकट उभे ठाकले आहे. परिणामी, विदर्भातील जलाशयावर विदेशातून स्थलांतरित होणा-या पक्ष्यांना पाणी समस्येसह खाद्यावरही परिणाम जाणवू लागला आहे. वाशिम जिल्ह्यातील एकपर्णी, यवतमाळ जिल्ह्यातील इसापूर, निभोना, लालखेड, अमरावती जिल्ह्यातील मालखेड तलाव, केकतपूर, कोंडेश्र्वर, छत्री तलाव, फुटका आदी जलाशयांची पाण्याची पातळी कमी असल्याची स्थिती आहे. या जलाशयावर वन्यप्राण्यांसह पक्षांचे थवेच्या थवे दिसून येतात. जलाशयावर मासेमारीसुद्धा जोरात सुरू आहे. त्यामुळे पक्ष्यांचे प्रमुख खाद्य असलेल्या मासेदेखील कमी झाले असून, पक्षीसंवर्धनाची बिकट समस्या उभी झाली आहे. नागपुरातील गोरेवाडा, बुलडाणा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील जलाशयांचीसुद्धा चांगली स्थिती नाही. उन्हाळा सुरू होण्यास अवधी असला तरी जंगलात वन्यप्राण्याची आतापासून पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. जंगलाशेजारील जलाशयांवर वन्यप्राणी, पशू पाण्यासाठी अवलंबून राहतात. मात्र, जानेवारी महिन्यातच जलाशये आटू लागल्याने एप्रिल, मे महिन्यात जलाशयांमध्ये पाणी कसे राहणार, हा चिंतनाचा विषय आहे. अकोला, अमरावती जिल्ह्यात जलाशयांमध्ये पुरेशे पाणीसाठा नाही. त्यामुळे मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वन्यजीवांना पाण्यासाठी दाहीदिशा करावी लागेल, असे चित्र आहे. विशिष्ट जलाशयावर विदेशी पक्षीविदर्भात विशिष्ट जलाशयावर विदेशी पक्षाचे आगमन झाले आहे. भारतात दरवर्षी १५९ प्रजातीचे पक्षी स्थलांतर करून येतात. यात थापट्या, शेंडीबदक, लालसरी, थोरले व धाकटे मराल, गडवाल, उचाट, सोनटीरवा, कुतवार, राजहंस, मंगोलिया, क्रौंच, सायबेरिया आदी पक्षांचा समावेश आहे. यंदा जलाशयांमध्ये पाणी कमी असल्याने पशू, पक्षाची संख्या रोडावणार, असे संकेत मिळत आहे. राजहंस पक्षी हिमालय पालथा घालून ३ ते ४ चार किमी प्रवास करून येतो. पक्षांचे खाद्य झाले कमीजलाशयात पाणी नसल्याने पक्ष्यांसमोर खाद्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. यात छोटे कीटक, शिंपले, मासे आदी हे पक्ष्यांचे खाद्य आहे. मात्र, जलाशयात पाण्याची पातळी कमी झाल्याने पक्ष्यांना खाद्यदेखील मिळणे दुरापास्त झाले आहे. विदेशी व जंगल पक्षाची आतापासून पाणी, खाद्यासाठी वनवन भटकंती सुरू झाली आहे. पक्ष्यांचे स्थलांतर ही पर्यावरण संतुलनासाठी अतिशय महत्त्वपूर्ण बाब आहे. परंतु, जलाशयाची अवस्था फारच गंभीर आहे. जलाशयाची पातळी वाढविणे गरजेचेपाणी अडवून जिरवणे ही मानसिकता बंद झाली आहे. शेतात बांदबंधिस्ती प्रथा बंद झाली. पाण्याची भूजल पातळी खोल गेली. तलावातील पाणी शेतीला दिले जाते. विहिरींचा वापर हळूहळू बंद होत आहे. उद्योगासाठी तलावातील पाणी वापर केला जातो. त्यामुळे जलाशयांकडे केवळ राजकारण म्हणून बघितले जाते. मात्र, विदर्भातील जलाशयांची पातळी वाढविण्यासाठी जलयुक्त शिवारमधून तलावातील गाळ काढून तो शेतकºयांना देणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतीला सुपिकता येईल. तलावांचे खोलीकरण झाले पाहिजे. पशू, पक्ष्यांसाठी पाणी उपलब्ध करणे हे मोठे आव्हान आहे. जलाशयांची स्थिती फार गंभीर आहे. शासन, प्रशासन स्तरावरून दखल घेतली नाही तर उन्हाळ्यात पाण्याअभावी पशू, पक्ष्यांना जीव गमवावा लागेल. - यावद तरटे पाटील, पक्षी अभ्यासक, अमरावती