औरंगाबाद : येथील न्यू नंदनवन कॉलनी परिसरातील भुजबळनगर व परिसरातील वसाहतींना गुरुवारी पाणीपुरवठा न झाल्याने नगरसेविकेच्या स्वीय सहायकाने जलवाहिनी कंपनीच्या दोन लाइनमनचे अपहरण करून त्यांना तब्बल एक तास विजेच्या खांबाला बांधून ठेवले होते. शनिवारच्या या गुंडगिरीमुळे औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीतील कर्मचारी घाबरले आहेत. गुरुवारी पाणीपुरवठ्याचा दिवस होता. मात्र, वसाहतींना पाणी मिळाले नाही. फारोळा येथून अत्यंत कमी दाबाने ज्युबिली पार्कच्या टाकीत पाणी आले. टाकीत कमी पाणी असल्याने भुजबळनगरला पाणीपुरवठा झाला नाही. शनिवारी पुन्हा पाणी सोडण्याचा दिवस होता. वेळेवर पाणी न आल्याने बसपाच्या नगरसेविका चारुलता दाभाडे यांचा स्वीय सहायक व कार्यकर्ता रिजवान खान याने दुपारी दोन वाजता पाण्याची टाकी गाठली. टाकीवर शेख वसीम आणि सचिन वाणी हे दोन लाइनमन होते. रिजवानने दोघांना पकडले आणि भुजबळनगरमधील चौकात विजेच्या खांबाला तासभर बांधून ठेवले.दोघांना बेदम मारहाण करण्याचा दमही भरण्यात आला. नंतर त्यांची सुटका करण्यात आली. सायंकाळी कंपनीचे अधिकारी स्वामी हे घटनास्थळी दाखल झाले. मात्र, त्यांनी दोघा लाइनमनची साधी विचारपूसही न केल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे.
पाण्यासाठी २ लाइनमनला खांबाला बांधले!
By admin | Published: August 22, 2016 5:18 AM