तासगाव : पाणी योजनांची पाणीपट्टी भरायला हवी. मात्र राज्यातील सर्व पाणी योजनांची पाणीपट्टी एकसारखी असायला हवी. तसे धोरण निश्चित करायला हवे. तसे केल्यास शेतकऱ्यांना ‘म्हैसाळ’ची पाणीपट्टी भरा, म्हणून सांगण्याची वेळ येणार नाही, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले. आर. आर. आबांवर विश्वास टाकणाऱ्या येथील जनतेचा अपेक्षाभंग होऊ देणार नाही. मात्र कार्यकर्त्यांनीही एकसंधपणा कायम ठेवावा, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले. अंजनी (ता. तासगाव) येथे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार जयंत पाटील, आमदार सुमनताई पाटील, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत कदम, माजी खासदार निवेदिता माने, स्मिता पाटील यांच्यासह राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.शरद पवार म्हणाले की, आबांच्या स्मारकाबाबत सरकारने विचार केला तर ठीक, नाहीतर आपले हात भक्कम आहेत. कामातून आदर्श निर्माण करणारे नेतृत्व कायम स्मरणात ठेवता येईल, असे स्मारक करायला हवे, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)
पाणीपट्टीचे धोरण एक हवे - शरद पवार
By admin | Published: February 17, 2016 3:21 AM