दावडी : भीमा नदीचे पात्र कोरडे पडले असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. जनावरांना पाणी मिळत नाही. उन्हाळी पिके जळून गेली आहेत. चासकमान धरणातून दोन दिवसांत पाणी नदीपात्रात सोडा; अन्यथा चासकमान डावा कालवा फोडून नदीपात्रात पाणी सोडणार, असा इशारा देत शेतकऱ्यांनी चासकमान प्रकल्पाधिकारी खेड यांच्या कार्यालयासमोर ‘ठिय्या आंदोलन’ केले.तालुक्याच्या पूर्वभागात भीमा नदीपात्रात होलेवाडी, खरपुडी, वाटेकरवाडी, निमगाव येथे छोटे-मोठे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहे. या बंधाऱ्याला मोठ्याप्रमाणात गळती आहे. दररोज लाखो लिटर पाण्याची गळती सुरू आहे. त्यातच उन्हाचा तडाखा, तसेच सतत उन्हाळी पिकांसाठी पाण्याचा उपसा सुरू असल्याने बंधाऱ्यातील पाण्याची पातळी झपाट्याने खालवत आहे. मांजरेवाडी (पिंपळ), शिरोली, मलघेवाडी सातकरस्थळ येथून जाणारी भीमा नदी कोरडी पडली आहे. येथील ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण सुरू झाली आहे. दोन दिवसांपूर्वी चासकमान धरणातून डाव्या कालव्यात पाणी सोडण्यात आले आहे. भीमा नदीपात्रात चासकमान धरणाचे पाणी सोडा, अशी मागणी करूनही अधिकारी वर्ग याकडे दुर्लक्ष करत आहे. नदीपात्रात पाणीच नसल्यामुळे पात्रालगत असलेल्या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींच्या पाण्याने तळ गाठला आहे. त्यामुळे जनावरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. नदीकाठावरील गावातील शेतकरी भीमा नदीत पाणी सोडा, अशी गावा-गावांतील मागणी शेतकरी करत असताना प्रशासन सुस्त असल्याने आज थेट राजगुरुनगर येथील चासकमान विभागाच्या कार्यालयावर शेतकऱ्यांनी मोर्चा काढून ‘ठिय्या आंदोलन’ केले. यावेळी अधिकारी उपस्थित नसल्याने शेतकरी आक्रमक झाले होते. यावेळ शिरोलीचे माजी सरपंच रवी सावंत, संतोष सांडभोर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक अध्यक्ष विलास मांजरे, शिवसेनेचे विभाग प्रमुख बाळासाहेब मांजरे, मांजरेवाडीचे ग्रामपंचायत सदस्य अशोक मांजरे, माजी सरपंच काळुराम मांजरे, मनोहर मांजरे, विलास मांजरे, बाबूराव मांजरे, सुनील मांजरे, काळुराम मांजरे, लक्ष्मण मांजरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)>दोन दिवसांत चासकमान धरणातून नदीपात्रात पाणी न सोडल्यास व शेतकऱ्यांना पाण्यासाठी वेठीस धरल्यास चासकमान धरणाचा वाहणारा डावा कालवा जेसीब यंत्राने फोडू व नदीपात्रात पाणी आणू, असा इशारा शेतकऱ्यांनी आक्रमक होत दिला. दरम्यान, शाखा आभियंता बी. आर. खेडकर यांना शेतकऱ्यांनी निवेदन दिले.
दावडी परिसरात पाण्याचा प्रश्न गंभीर
By admin | Published: April 06, 2017 12:47 AM